Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना काँग्रेसला लक्ष्य केले. पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधतानाच 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा बिगुलही वाजवला. (Narendra Modi In Lok Sabha) आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 370 हून अधिक तर एनडीएला 400 हून अधिक जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणात त्यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी भाजपच्या पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममध्ये केलेल्या कामांची माहिती दिली आणि तिसऱ्या टर्मचे भविष्य आणि पुढील टर्ममध्ये ते काय करणार याबाबत भाष्य केले आहे.
मोदींच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे
पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच सभागृहात तिसऱ्यांदा विजयी होणार असल्याचा दावा केला. यासोबतच आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, यूपीए सरकारने 30 वर्षांची कालमर्यादा दिली होती, मात्र तिसऱ्या कार्यकाळात आम्ही भारताला विकसित भारत बनवू ही मोदींची गॅरंटी आहे.
तसेच काँग्रेस ज्या पद्धतीने काम करत होती, त्या गतीने आम्ही कामे केली असती तर भारताला इथपर्यंत पोहोचायला 500 वर्षे लागली असती. म्हणजे पाच पिढ्या गेल्या असत्या. मागील 10 वर्षात 17 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आले. आम्ही काँग्रेसचा मार्ग स्वीकारला असता तर यासाठी 60 वर्षे लागली असती. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू 15 ऑगस्टला म्हणाले होते की, देशातील सर्व लोकांना काम करण्याची सवय नाही, भारतातील लोकांमध्ये आळस आहे. युरोप, चीन आणि अमेरिकेतील लोक जेवढे काम करतात तेवढे काम आपण करू शकत नाही. हे सांगून त्यांनी देशातील जनतेला निराश केले, असेही मोदींनी सांगितले.
मोदी म्हणाले की, आम्हाला आमच्या पहिल्या टर्ममध्ये यूपीएच्या सरकारमध्ये असलेले खड्डे भरायला खूप वेळ लागला. दुसऱ्या कार्यकाळात आम्ही नव्या भारताचा पाया रचला. तर तिसऱ्या टर्ममध्ये आम्ही तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवू.
पहिल्या टर्मबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, पहिल्या टर्ममध्ये स्वच्छ भारत, उज्ज्वला, आयुष्मान भारत, सुगम्य भारत, डिजिटल इंडिया यासारखी कामे सुरू झाली. करप्रणाली सुलभ करण्यासाठी जीएसटीसारखे निर्णय घेण्यात आले. या कामांमुळे जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला.
यानंतर दुसरी टर्म सुरू झाली. ज्यामध्ये आम्ही संकल्प व आश्वासने पूर्ण करण्याचे काम केले. ज्याची देश खूप दिवसांपासून वाट पाहत होता. ते पूर्ण करण्याचे काम केले. मोदी म्हणाले की, आपण कलम 370 रद्द झाल्याचे पाहिले. दुसऱ्या टर्ममध्ये नारी शक्ती हा उपक्रम राबवण्यात आला. यासोबतच ज्या राम मंदिराची वर्षानुवर्षे प्रतिक्षा होती ते मंदिर उभारण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीवर चर्चा करताना मोदी म्हणाले की, आता निवडणुकीसाठी जास्तीत जास्त 100 दिवस शिल्लक आहेत. यावेळी एनडीए 400 हून अधिक जागा जिंकेल. मला आकडेवारीचा त्रास होत नाही. मात्र, एनडीए निश्चितपणे 400 पार करेल, असा देशाचा मूड दिसत आहे. तसेच भाजपला 370 जागा नक्कीच मिळतील.
Narendra Modi यांचा काँग्रेसवर घणाघात
मागील 10 वर्षातील आपल्या प्रमुख कामांची माहिती देताना पंतप्रधान म्हणाले, मागील 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. गरिबांना विविध साधने आणि स्वाभिमान मिळाला. गरिबीला हरवण्याची ताकद गरिबांमध्ये आहे. आपल्या बांधवांनी गरिबीला हरवण्याचा निर्धार केला आहे. आज 50 कोटी गरीब लोकांचे स्वतःचे बँक खाते आहे. 4 कोटी लोकांकडे कायमस्वरूपी घरे आहेत. 11 कोटी कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे. 25 कोटी लोकांना आयुष्मान कार्ड मिळाले आहे. 80 कोटी लोकांना मोफत उपचार सेवा देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधानांनी खादी उद्योगाबद्दलही भाष्य केले. “खादी उद्योगाला आम्ही पुढे नेण्याचे काम केले. आपले सरकार प्रत्येक कानाकोपऱ्यातील गरिबी दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 लाख 80 हजार कोटी रुपये देण्यात आले. मच्छिमार आणि पशुसंवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्यात आले. किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले, जेणेकरून ते आपला रोजगार वाढवू शकतील”, असे मोदींनी नमूद केले.
त्याचवेळी मोदी पहिल्यांदाच महागाईवर बोलले. आमच्या सरकारने महागाई नियंत्रणात ठेवल्याचे ते म्हणाले. दोन महायुद्धे आणि 100 वर्षांतील सर्वात मोठ्या आपत्तीनंतरही महागाई नियंत्रणात आहे. काँग्रेस आल्यावर महागाईला आमंत्रित करते, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
तसेच आमच्या सरकारने 10 कोटी बनावट लोकांना काढून टाकले आहे. पूर्वीच्या काळी विधवा निवृत्ती वेतन न जन्मलेल्या मुलीला देखील दिले जायचे. पण ही बनावट नावे काढून आम्ही 3 लाख कोटी रुपये वाचवले आहेत.