लोकसभेच्या रिंगणात वंचितचा लढा कुणाविरोधात?, प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prakash Ambedkar | लोकसभा निवडणुकीमुळे सर्वत्र प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष होणार आहे. अशात वंचित नेमकी मविआला पाठिंबा देणार की नाही?, याबाबत चर्चा रंगत होत्या. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात शाब्दिक वादही पाहायला मिळाला. त्यामुळे आंबेडकर यांची मविआबाबत भूमिका नेमकी काय?, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटरवर कार्यकर्त्यांना पत्र लिहीत त्यात त्यांनी खरी लढाई कोणाविरुद्ध हे स्पष्ट केलं आहे. वंचितने काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तर काही मतदारसंघात महाविकास आघाडीच्याविरोधात उमेदवार दिला आहे. त्यामुळे वंचितचा प्रयोग नेमका कुणाविरोधात सुरुये, याबाबत फक्त सर्वसामान्यांमध्येच नाही तर कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. अशात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहीत मोठा खुलासा केलाय.

प्रकाश आंबेडकर यांचे पत्र

कार्यकर्त्यांच्या बहुमोल पाठिंब्याबद्दल, अतूट निष्ठा आणि पक्षासाठी तुम्ही केलेल्या अखंडीत कामाबद्दल आभार मानण्यासाठी हे पत्र लिहित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आपली वाढती शक्ती आणि महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थितीने आपल्याला एक संधी दिली आहे, ती म्हणजे राज्यस्तरीय पक्ष बनण्याचे आपले स्वप्न साकार करण्याची. हे केवळ आपले स्वप्न नाही; तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते; ते भैय्यासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. मला माहित आहे की, तुम्ही सर्वजण हे 70 वर्षांचे अपूर्ण स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत, असा विश्वास आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रात व्यक्त केला.

पहिल्या टप्प्यातील मतदारसंघातील निवडणूक लढती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यात आहे. आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका. महाराष्ट्रातील ही लढाई फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहे, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत. महाराष्ट्रात भाजप उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहे आणि महाराष्ट्रातील जागा वाटपावरून मित्रपक्षांशी संघर्ष करत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात उघडपणे बंड करत आहेत. महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थिती पाहता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी या लढाईमध्ये संपूर्ण ताकदीने लढण्यास सक्षम आहे. यामुळेच काँग्रेसलाही मतदारांमधील आमची लोकप्रियता कळते आणि म्हणून आम्हाला त्यांच्या दिल्लीत बसलेल्या काँग्रेसच्या हायकमांडने नागपुरातील त्यांच्या उमेदवारासाठी पाठिंबा देण्याची विनंती केल्याचं त्यांनी सांगितलं.

“वंचित त्यांची दुकाने बंद करेल म्हणून..”

माझी तुम्हाला आणखी एक विनंती आहे की, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या पगारावर काम करणाऱ्या फेक न्यूज यंत्रणांनी पेरलेल्या खोट्या बातम्या वाचून आणि पाहून तुमचा संयम गमावू नका. त्याचा सातत्याने सामना करा आणि तुमचा संयम गमावू नका. खरे तर त्यांना आपल्या पक्षाची आणि वाढत्या लोकप्रियतेची भीती वाटते या गोष्टीचा तुम्हाला आनंद आणि गर्व वाटला पाहिजे. खोट्या बातम्या देऊन आपल्याला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आपण किती सामर्थ्यवान झालो आहोत हे दर्शवते. वंचित बहुजन आघाडी त्यांची दुकाने बंद करेल याला ते घाबरत असल्याचं वास्तव आहे, असे ते म्हणाले. त्यांनी मीडियावर पण तोंडसूख घेतले. प्रचारासाठी बाहेर पडाल तेव्हा पुरेशी काळजी घ्या. पाण्याची बाटली आणि सोबत दुपट्टा ठेवा, असा काळजीवाहू सल्ला पण आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी  दिला.

News Title : Prakash Ambedkar Emotional Letter To Workers

महत्त्वाच्या बातम्या –

आज GT vs DC संघ भिडणार; घरबसल्या कुठे व किती वाजता सामना पाहता येणार

या दोन राशींना कष्टाच्या कामातून धनलाभ संभवतो

अजित पवार भुईसपाट तर एकनाथ शिंदेंचं राजकारण संपणार?, धक्कादायक पोल समोर

अजित पवार एकही लोकसभेची जागा जिंकणार नाही!, सर्वात धक्कादायक अंदाज

खासदाराच्या प्रचारादरम्यान आमदाराला आली चक्कर, रूग्णालयात उपचार सुरू