Team India ला पुन्हा अपयश! ऑस्ट्रेलियाचा विजयरथ कायम; पाहुण्यांचा गोड शेवट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Team India | बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवण्याचे भारतीय संघाचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळाले आहे. पहिल्या सामन्यात अप्रतिम कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाला लय कायम ठेवता आली नाही. अखेर ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा विजय मिळवून यजमान भारताला मोठा धक्का दिला. अलीकडेच टीम इंडियाला वन डे मालिकेत दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. खरं तर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारताला ऑस्ट्रेलियाने सलग नऊ मालिकांमध्ये चीतपट केले. मंगळवारी झालेल्या अखेरच्या ट्वेंटी-20 मध्ये देखील कांगारूंचे वर्चस्व पाहायला मिळाले अन् भारताने सामन्यासह मालिका गमावली.

भारतीय संघाचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 7 विकेट राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य होते. ॲलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने 18.4 षटकांत 3 विकेट गमावून लक्ष्य गाठले.

Team India ला पुन्हा अपयश!

अशा प्रकारे कांगारूंनी 3 ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला होता, पण शेवटचे दोन सामने जिंकून पाहुण्यांनी मालिका खिशात घातली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने साजेशी कामगिरी केली. भारताने दिलेल्या 148 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर ॲलिसा हिली आणि बेथ मुनी यांनी पहिल्या विकेटसाठी 85 धावा जोडून सामना एकतर्फी केला.

कर्णधार ॲलिसा हिली आणि बेथ मुनी यांना अर्धशतक झळकावण्यात यश आले. ॲलिसा हिलीने 38 चेंडूत 55 धावा केल्या. त्याचवेळी, बेथ मुनी 45 चेंडूत 52 धावा करून नाबाद माघारी परतली. ताहिला मॅकग्राने 15 चेंडूत 20 धावा केल्या. एलिसे पेरीला खाते उघडता आले नाही, तर फोबो लिचफिल्ड 13 चेंडूत 17 धावा करून नाबाद राहिली.

ऑस्ट्रेलियाचा विजयरथ कायम

भारताकडून अखेरच्या सामन्यात देखील पूजा वस्त्राकरने चमकदार कामगिरी केली. या संपूर्ण मालिकेत पूजाने अप्रतिम कामगिरी केली. अखेरच्या सामन्यात ती सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. पूजा वस्त्राकरने 3.4 षटकात 26 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय दीप्ती शर्माने 1 विकेट घेतली. तर रेणुका सिंह ठाकूर, तितस साधू आणि श्रेयांका पाटील यांना यश मिळाले नाही.

तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. भारतीय सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी पॉवरप्लेचा फायदा घेतला. मात्र, संघाची धावसंख्या 39 असताना टीम इंडियाचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले.

भारताकडून रिचा घोषने 28 चेंडूत सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली. शेफाली वर्माने 17 चेंडूत 26 धावा केल्या. स्मृती मानधनाने 28 चेंडूत 29 धावांचे योगदान दिले. अमनजोत कौरने शेवटच्या षटकांमध्ये 17 धावांची स्फोटक खेळी केली. मात्र, हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्जसारख्या फलंदाजांनी पुन्हा निराशा केली. अखेर निर्धारित 20 षटकांत भारताने 6 बाद 147 धावा केल्या, ज्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 18.4 षटकांत 3 विकेट गमावून पूर्ण केला.

Mohammed Shami चा अर्जुन पुरस्कारानं सन्मान; ‘लेका’चा गौरव अन् आईचे डोळे पाणावले

Jackie Shroff | राम मंदिर उद्धाटनावर जॅकी श्रॉफ यांची पोस्ट, म्हणाले…

Sharad Mohol च्या हत्येबाबत सर्वात मोठी माहिती समोर, ‘या’ दोन व्यक्तींनी दिली आरोपींना साथ

Compact Powder वापर असाल तर ही बातमी नक्की वाचा!

‘…म्हणून मी आडनाव बदलून टाकलं ‘; Pankaj Tripathi यांचा मोठा खुलासा!