IND vs SA | दिग्गजांना जमलं नाही ते रोहित शर्मा करून दाखवणार?; भारताला इतिहास रचण्याची संधी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs SA | भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून, तिथे उद्यापासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेतील चमकदार कामगिरीनंतर टीम इंडिया कसोटी मालिकेत यजमानांशी भिडेल. वन-डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर प्रथमच कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे मैदानात दिसणार आहेत.

भारतीय संघाने आफ्रिकेच्या धरतीवर ट्वेंटी-20 मालिका 1-1 अशा बरोबरीत संपवली, तर वन डे मालिका 2-1 अशा फरकाने खिशात घातली. आता दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज असून, सलामीचा सामना उद्यापासून सेंच्युरियन येथे खेळवला जाईल. तर 3 जानेवारीपासून केपटाउन येथे दुसऱ्या सामन्याचा थरार रंगेल.

IND vs SA | इतिहास रचण्याची रोहितसेनेला संधी

दरम्यान, आगामी मालिकेत पाहुण्या भारतीय संघाची ‘कसोटी’ असणार आहे. कारण 1992 पासून अद्याप एकदाही भारताला आफ्रिकेच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. दिग्गज सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि सौरव गांगुली यांच्या नेतृत्वात देखील टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आली नाही. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मासमोर इतिहास रचण्याचं आव्हान असेल. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकूण 8 द्विपक्षीय कसोटी मालिका खेळल्या असून, यामध्ये सातवेळा पाहुण्यांना पराभव पत्करावा लागला, तर एकदा मालिका अनिर्णित राहिली.

मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा दबदबा असला तरी आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 15 द्विपक्षीय कसोटी मालिका झाल्या आहेत. यापैकी टीम इंडियाने केवळ चारवेळा विजय संपादन केला आणि आठवेळा भारताला पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय तीन मालिकांचा निकाल लागला नाही अन् त्या अनिर्णित राहिल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर भारताची ‘कसोटी’
एकूण कसोटी मालिका – 8
यजमान संघ – सातवेळा विजय
भारतीय संघ – एकदाही जिंकला नाही
अनिर्णित – १ मालिका

IND vs SA कसोटी मालिकांमधील आकडेवारी
एकूण कसोटी मालिका – 15
दक्षिण आफ्रिका – 8 विजय
भारतीय संघ – 4 विजय
अनिर्णित – 3 मालिका

IND vs SA | भारतासमोर मोठं आव्हान

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यांमधील आकडेवारी पाहता भारतासमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण एकदाही टीम इंडियाला आफ्रिकेच्या घरात जाऊन त्यांना कसोटी मालिकेत पराभूत करण्यात यश आलं नाही. आफ्रिकेच्या धरतीवर यजमान संघाच्या तुलनेत भारतीय संघ कमजोर असल्याचं दिसतं. भारतीय संघाने आतापर्यंत आफ्रिकेत एकूण 23 कसोटी सामने खेळले असून, चारवेळा विजय मिळवला तर 12 सामने गमावले आहेत. याशिवाय 7सामने अनिर्णित राहिले. मात्र, दोन्ही संघांमध्ये एकूण 42 कसोटी सामने झाले आहेत, ज्यापैकी भारताने 15 जिंकले आणि 17गमावले. याशिवाय दहा सामने अनिर्णित राहिले. एकूणच भारताला आफ्रिकेच्या धरतीवर यजमान संघाचा सामना करण्यात आतापर्यंत संघर्ष करावा लागला आहे.

आगामी मालिकेसाठी भारताचा कसोटी संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, अभिमन्यू ईश्वरन, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक
26 ते 30 डिसेंबर – दुपारी 1.30 वाजल्यापासून (सेंच्युरियन)
3 ते 7 जानेवारी – दुपारी 1.30 वाजल्यापासून (केपटाउन)

महत्त्वाच्या बातम्या- 

Corona Virus | काळजी घ्या! पुणेकरांसाठी अत्यंत चिंताजनक बातमी समोर

INDvSA Test Series | राहुल द्रविडने दिले संकेत, आफ्रिकेवरुद्ध असा असेल भारतीय संघ?

Apoorva Shukla | मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर; 35 व्या वर्षी अभिनेत्याचा मृत्यू

Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर

Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण