…तोपर्यंत चप्पल घालणार नाही म्हणणाऱ्या गुरुजींचे मनसेने धुतले पाय, चप्पलही घातली!

पुणे | वाबळेवाडीचा जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा बनवणारे शाळेचे तत्कालीन मुख्यध्यापक दत्तात्रय वारे गुरुजी यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर त्यांचं शाळेतून निलंबन झालं होतं. त्यांनी त्या आरोपानंतर पायात चप्पल घालणं देखील सोडून दिलं होतं. जोपर्यंत मी निर्दोष असल्याच सिद्ध होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, असा निर्णय दत्तात्रय वारे (Dattaray Ware) गुरुजी यांनी घेतला होता. मात्र आता त्यांच्यावर झालेल्या सर्व आरोपातून त्यांना मुक्त करण्यात आलं आहे.

वारे गुरूजींना निर्दोष ठरवल्यानंतर मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी वाबळेवाडीतील शाळेत जाऊन वारे गुरुजींचे पाय धुतले. आरोपाच्या वेदना सहन न झाल्याने अनवाणी राहिलेल्या पायांच्या वेदना शमवण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याच्या भावना प्रकाश महाजन यांनी व्यक्त केल्या आहेत.

महाजन यांनी वारे गुरूजींच्या पायाला चंदन लावून त्यांचे पाय धुतले. या शिक्षकाच्या नशिबी असे दिवस येणं हे किती मोठं दुर्दैव असल्याचं महाजन म्हणाले. गुरुजींसोबत जे घडलं ते दुर्देवी आहे, असं महाजन म्हणाले.

शाळेच्या विकासासाठी गावकऱ्यांचा समावेश असलेली शाळा विकास समिती वाबळेवाडीत काम करत होती. शाळेसाठी ही समिती ऐच्छिक स्वरुपात देण्यात येणाऱ्या देणग्या स्वीकारत होती. देणग्या स्वीकारताना त्याचा व्यवस्थित हिशोब ठेवला नसल्याचं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दत्तात्रय वारे यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या-