Pune News | भाजपनं राज्यसभेसाठी नावांची घोषणा केली, त्यामध्ये एक नाव आहे प्राध्यापिका मेधा कुलकर्णी यांचं… मेधा कुलकर्णी यांच्यावर फारच अन्याय झाला होता, राज्यसभेच्या निमित्ताने तो आता दूर झाला आहे. मात्र मेधा कुलकर्णी राज्यसभेवर जाणार असल्यानं पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. मेधा कुलकर्णींच्या राज्यसभा तिकीटाच्या निमित्तानं पुण्याच्या राजकारणात नेमकी काय उलथापालथ झालीय आणि त्याचे काय परिणाम असतील?, हेच आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत.
अधिक जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पाहा…
भाजपनं यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी 400 प्लसचा नारा दिला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर पुण्याची (Pune News) जागा ही अत्यंत महत्त्वाची जागा मानली जाते. इथून याआधी भाजपचे गिरीश बापट खासदार होते, मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झाल्यानं ही जागा रिक्त झाली आहे. पोटनिवडणूक झाली नाही, त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीतच इथला खासदार ठरणार आहे. मात्र कोण??? यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा तसा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, बालेकिल्ला असला तरी बापट यांच्यानंतर सहज निवडणून येईल, असा उमेदवार भाजपला द्यावा लागणार आहे. कारण नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानं भाजपचं तोंड चांगलंच होरपळून निघालं आहे, त्यामुळं बालेकिल्ला आहे, बालेकिल्ला आहे असं म्हणून पुण्यातील मतादारांना हलक्यात घेणं पुन्हा एकदा भाजपसाठी दणका देणारं ठरू शकतं. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या भाजपसाठी त्यामुळे पुण्याची जागा पुन्हा एकदा अवघड जागेचं दुखणं झाल्यासारखी दिसत आहे. या मतदारसंघातून भाजपसाठी काही आव्हानं आहेत, त्यातील सर्वात पहिलं आव्हान आहे उमेदवारांची निवड
पुणे (Pune News) भाजपमध्ये नेत्यांची मोठी मांदियाळी आहे. गिरीश बापट यांच्यानंतर शहरात अनेक मोठमोठे नेते भाजपकडे आहेत, वरकरणी सगळे एकमेकांशी गोडगोड वागताना दिसत असले, तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न ते अजिबात सोडताना दिसत नाहीत. शहराध्यक्षाची निवड असेल किंवा गिरीश बापट यांच्या निधनानंतर झालेली फ्लेक्सबाजी असेल… पुणे भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार चढाओढ सुरु आहे.. त्यामुळे उमेदवाराची निवड करताना भाजपला काळजी घ्यावी लागणार आहे, नाहीतर एकमेकांचे पाय ओढण्याच्या नादात, भाजपला ही जागा गमवावी सुद्धा लागू शकते.
उमेदवारांच्या निवडीनंतर भाजपपुढं या मतदारसंघातील सर्वात मोठं दुसरं आव्हान आहे, ब्राह्मण समाजाची मर्जी राखणं… पुणे लोकसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजाचा वरचष्मा राहिला आहे. ब्राह्मण समाज तसा भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो, मात्र समाजाचा विचार न करता उमेदवार दिला गेला, तर या समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतात. सध्या भाजपने यावर तात्पुरतं सोल्युशन काढलेलं दिसत आहे, मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा दिल्याने ब्राह्मण समाजाला खूश केल्याचं सांगितलं जातंय, मात्र तरीही ऐन लोकसभेला काय गणितं असतील यावरच सारं काही ठरणार आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत लागलेला निकाल हा भाजसाठी आव्हान निर्माण करणारा आणखी एक मुद्दा आहे. कसब्यात भाजपच्या मुक्ता टिळक आमदार होत्या, मात्र त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. पुणे लोकसभेप्रमाणे कसबा विधानसभा मतदारसंघही भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. हेमंत रासने यांना भाजपनं संधी दिली होती, मात्र इथं सगळ्यात धक्कादायक पराभवाची नोंद झाली. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपला जो काही धक्का दिला, त्याचे दणके थेट दिल्लीपर्यंत जाणवले. बालेकिल्ल्यात झालेला हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असेलच, मात्र या पराभवापासून भाजपनं काही धडा घेतला का?, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे.
भाजपकडे पुण्यातून कोणकोणते पर्याय?
पुणे लोकसभेसाठी सर्वात प्रबळ दावेदार असलेलं पहिलं नाव म्हणजे सुनील देवधर… पुणे लोकसभेसाठी भाजपच्या नावांची चर्चा करताना अनेकांना हे नाव दुय्यम वाटतंय किंवा मेधा कुलकर्णी यांच्या राज्यसभा उमेदवारीनंतर हे नाव मागं पडल्याचं मानलं जातंय. मात्र तसं मानण्याचं अजिबात कारण नाहीये. देवधर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले नेते आहेत, त्यांची ही परंपरा त्यांच्या वडिलांपासून चालत आलेली आहे. त्यांचे वडील स्वतः संघाचे प्रचारक होते. सुनील देवधर यांचा जरी विचार करायचा झाला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तसेच भाजपमध्ये सुनील देवधर यांचं योगदान नेहमी राष्ट्रीय पातळीवर राहिलेलं आहे. ईशान्य भारतात भाजपसाठी पोषक वातावरण तयार करण्याचं काम त्यांनी केलं. मोदींची लूक नॉर्थ ईस्ट पॉलिसी राबवण्याचं काम देवधर यांनी प्रभावीपणे केलं आहे.
मोदींनी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर, त्यांचं तिथं सारथ्य करण्याचं काम देवधर यांच्या खांद्यावर टाकण्यात आलं होतं. एवढ्या काही उदाहरणांवरुन देवधर यांचं भाजपमधील वजन ताडता येऊ शकतं. देवधर इथं आलेत आणि निवडणुकीच्या तयारीला लागलेत, असा साधा सरळ कुणाचा अंदाज असेल तर तो तितका खरा नाही. भाजपमध्ये आणि विशेषता संघात लोकांना मिशन देऊन पाठवलं जातं. गिरीश बापट यांच्या निधनानंतर मूळचे पुण्याचेच असलेले देवधर पुण्यात सक्रीय झालेत, हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. त्यातही देवधर मोदी-शहांच्या खास मर्जीतले मानले जातात. वरुन आदेश आला तर भाजपमधील कुठला नेता सुनील देवधर यांचं काम करण्यास नकार देणार आहे?, या सर्व कारणांमुळेच सुनील देवधर पुण्यातून उमेदवारीचे सर्वात प्रबळ दावेदार ठरतात….
पुण्यातून (Pune News) भाजपच्या उमेदवारीसाठी दुसरा नंबर लागतो तो पुण्याच्या अण्णांचा… अर्थात मुरलीधर मोहोळ यांचा… कोथरुडमध्ये जसा मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाला, तसाच या माणसावर सुद्धा झाला. मेधा कुलकर्णी यांच्यासोबत टस्सल असलेल्या या माणसाला सुद्धा कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीमुळे मोठा फटका बसला. मात्र महापौरपद मिळाल्यानं हा अन्याय काहीसा कमी झाला. गिरीश बापट यांच्या निधनानंतर लगेचच मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची लोकसभेसाठी चर्चा सुरु झाली होती. विशेषता पुण्यातील पत्रकार या नावासाठी फारच आग्रही होते, मात्र सुनील देवधर यांच्या एन्ट्रीनं अण्णांच्या लोकसभा उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. चंद्रकांत पाटील यांचं भाजपमधील ढासळतं स्थान पाहता कोथरुडमधून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळते की नाही यावर शंका व्यक्त केली जात आहे. जर पाटलांना पुन्हा कोथरुडमधून संधी मिळाली नाही तर मेधा कुलकर्णींना तिकीट दिलं जाण्याची शक्यता होती, मात्र मेधा कुलकर्णींना राज्यसभा दिल्यानं इथं फक्त मुरलीधर मोहोळ हे एकच नाव उरलं आहे. त्यामुळे उद्या लोकसभेचं तिकीट दिलं नाही तरी विधानसभेचं तिकीट देऊन आण्णांना खाली बसवलं जाऊ शकतं. तसंही केंद्रात काम करायचं म्हटलं तर आण्णापेक्षा सुनील देवधर ही केव्हाही भाजपची पहिली पसंत असेल.
या सर्व गोष्टी मोहोळ यांच्या लोकसभा उमेदवारीसाठी मारक ठरत असल्या, तरी काही जमेच्या बाजू सुद्धा त्यांच्याकडे आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे राज्यातील भाजप नेतृत्वाशी असलेले मधुर संबंध… गेल्या काही दिवसात मोहोळ यांनी आयोजित केलेल्या सर्वच कार्यक्रमांमध्ये राज्यातील शीर्ष भाजप नेत्यांनी हजेरी लावलेली आहे, यावरुन या गोष्टीची कल्पना येऊ शकते. मात्र इथं ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहीजे, की तिकीट मुंबईतून नव्हे तरी दिल्लीतून फायनल होत असतं. अण्णांची दुसरी जमेची बाब म्हणजे जनाधार… महापौर बनल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांचा पुण्यातील जनाधार चांगलाच वाढला आहे. त्यांच्या कर्वे रोडवरील कार्यालयात एक दिवस थांबलं, तरी याची प्रचिती येऊ शकते. विशेषतः कोथरुड भागातील जनतेच्या समस्या सोडवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे मुरलीधऱ मोहोळ यांचं कार्यालय झालं आहे, त्यामुळे लोकांमध्ये एक चांगला, समाजाच्या समस्या सोडवणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होताना दिसत आहे. कुठल्याही वादात मोहोळ यांचं नाव नसतं, त्यामुळे पुण्यातील एक स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं.
वरील दोन नावांशिवाय काही अन्य नावं सुद्धा पुण्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी रेसमध्ये आहेत. त्यात जगदीश मुळीक आणि भाजपचे पुणे शहाराध्यक्ष धीरज घाटे यांचा नंबर लागतो. धीरज घाटे यांची कट्टर हिंदुत्त्ववादी अशी प्रतिमा आहे, माजी खासदार गिरीश बापट यांच्या भागात त्यांचा चांगलाच प्रभाव आहे, मात्र त्यांनी नुकताच शहाराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे, त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता फारच कमी आहे. वरील उमेदवारांशिवाय आणखी एक नाव म्हणजे जगदीश मुळीक यांचं… भाजपचे शहराध्यक्ष राहिलेले जगदीश मुळीकही या शर्यतीमध्ये आहेत. एक मराठा उमेदवार म्हणून त्यांना प्रोजेक्ट केलं जात आहे, मात्र भाजप अशा पद्धतीनं कितपत विचार करतो?, यावर प्रश्नचिन्ह आहे.
जगदीश मुळीक यांनी गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात अनेक मोठमोठाल्या बाबांचे आणि प्रवचनकारांचे कार्यक्रम आयोजित करुन प्रसिद्धी मिळवली, मात्र भाजपचं तिकीट मिळवण्यासाठी तेवढी पुरेसी आहे का?, तर याचं उत्तर नक्कीच नाही असं आहे. त्यातही गिरीश बापट यांच्या निधनानंतर भावी खासदार म्हणून लागलेले त्यांचे बॅनर वादाचा विषय ठरले होते, भाजपमध्ये अशा गोष्टींना अजिबात थारा नसल्यानं, त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्या उमेदवारीवर झाला आहे. शहराध्यक्षपद गेल्यानंतर ते भाजपमध्ये थोडे बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे, मात्र भाजपचं धक्कातंत्र पाहता केव्हा काय घडेल हे सांगता येत नाही, तसं झालं तर लोकसभेच्या उमेदावारीची माळ जगदीश मुळीक यांच्या गळ्यात सुद्धा पडू शकते.
आम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विचार करता पुण्यातून चार नावं भाजपच्या लोकसभा उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. एक सुनील देवधर, दोन मुरलीधर मोहोळ, तीन जगदीश मुळीक आणि चार धीरज घाटे.
News Title : Pune News Medha Kulkarni’s Rajya Sabha candidacy changed calculations
महत्त्वाच्या बातम्या-
सुंदर आणि तजेलदार त्वचा हवीये?, मग रोज करा ‘या’ फळांचं सेवन
सर्व्हेमध्ये झाला मोठा खुलासा, महिलांना आवडतात ‘अशा’ प्रकारचे पुरुष
टायगर ईज बॅक, महेश गायकवाड यांना डिस्चार्ज, ठाण्यात झळकले बॅनर्स
मेट्रोनं प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!
‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाने पोस्ट करत दिली मोठी गुड न्यूज!