मुंबई | राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह होता. या गणेशोत्सवादरम्यान गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा कोल्हापुरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण गणेशोत्सव असल्याने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली होती. पण गणेशोत्सव काळात अहमदनगरमध्ये गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याच कार्यक्रमामुळे गौतमीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवर काल सायंकाळी मृत्यूंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. हाच कार्यक्रम गौतमी पाटील आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना भारी पडण्याची शक्यता आहे. कारण पोलिसांनी गौतमी आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.
यापूर्वीदेखील गौतमी पाटीलवर सोलापूरमध्ये गुन्हा दाखल झालेला होता. विरारमध्येही तिच्या कार्यक्रमावरुन मोठा वाद झालेला. जिथं जिथं गौतमीचे कार्यक्रम होतात तिथं हुल्लडबाजीचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिस तिच्या कार्यक्रमांना परवानगी देत नाहीत. नगरमध्ये विनापरवाना रस्त्यावर कार्यक्रम घेतल्याप्रकरणी गौतमीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, परवानगी नसतानाही कार्यक्रम केल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गौतमी पाटील आणि संयोजकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वत: गौतमी पाटील, तिचा स्वीयसहायक अशोक खरात, कार्यक्रमाचे संयोजक राहुल सांगळे, आनंद नाकाडे, हर्षल भागवत यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-