‘महाराष्ट्रात जर पुन्हा हे घडलं तर…’; राज ठाकरे भडकले

मुंबई | मुलुंड येथील सोसायटीमध्ये ऑफिससाठी जागा बघायला गेलेल्या मराठी महिलेला नकार देण्यात आल्याचं पाहायला मिळाले. दरम्यान घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या महिलेला केवळ ती मराठी असल्याने ऑफिस नाकारण्यात आल्याने राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. या मुद्द्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे, असंही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.

मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वगैरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहीत नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला आहे, अशी माहिती राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलीय.

हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

तृप्ती देवरुखकर या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. त्यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून तिची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. मुलुंड पश्चिमेकडील शिव सदन या इमारतीमध्ये त्या ऑफीससाठी जागा पाहायला गेल्या होत्या. मात्र तेथील सेक्रेटरीने त्यांना जागा देण्यास नकार दिला. इथे महाराष्ट्रीयन लोक अलाऊड नाहीयेत. मराठी माणसांना जागा देण्यास इथे परवानगी नाही असं त्याने स्पष्ट केलं. या अजब मुद्यानंतर तृप्ती यांनी त्यांना जाब विचारला असता, तो इसम हमरीतुमरीवर आला. तुम्हाला जे करायचंय ते करा, पोलिसांना किंवा ज्याला कोणाला बोलवायचं ते बोलवा, गुर्मीत असं उत्तर त्याने आणि त्यांच्या मुलाने तृप्ती यांना दिलं. तिने हा सर्व प्रकार मोबाईलवर रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिच्या हातातील मोबाईलही हिसकावून घेतला.

महत्त्वाच्या बातम्या-