“केवळ एका राज्यसभेच्या भाकर तुकड्यासाठी…”; शरद पवारांच्या शिलेदारानं अशोक चव्हाणांना सुनावलं

Ashok Chavan | राज्यातील राजकारणामध्ये कधी काय घडेल हे सांगता येत नाही. कधी कोण राजीनामा देईल तर कधी कोण कुठल्या पक्षात प्रवेश करेल हे सध्या सांगणं कठिण आहे. आता येत्या काही तासांमध्ये भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू होण्याची शक्यता आहे. अशातच आता काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत असून राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे झालं ते आता काँग्रेसचं होईल का? असा सवाल उपस्थित होत आहे. काँगेस पक्षाच्या मोठ्या नेत्यानं दिलेला राजीनामा हा सध्याच्या राजकारणातील मोठा ट्विस्ट आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे सर्व होत असल्यानं राजकारणातील वातावरण हे चिघळलं आहे. अचानक पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा का दिला असावा असा सवाल आता काँग्रेस पक्षाकडून होताना दिसत आहे. आपल्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी माध्यमांशी बोलताना राजीनामा प्रकरणावर मौन सोडलं आहे.

राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया

अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मला पक्षाच्या अंतर्गत विषयाबाबत काही बोलायचं नाही. माझा कोणावर रागही नाही. मी अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम केलं आहे. अजून किती दिवस काम करणार यामुळे मी राजीनामा दिला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेत आमदारकीचा राजीनामा दिला. मी माझी पुढील राजकीय भूमिका येत्या दोन दिवसांमध्ये स्पष्ट करणार आहे,” असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

येत्या दोन दिवसांमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. याचसह ते आपल्यासोबतचे काही नेते घेत भाजपसोबत हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच राजीनामा प्रकरणावर राज्यभरातून टीका होताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यानं अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर ट्वीट करत चांगलंच झापलं आहे.

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर टीका

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर आता राजकीय वर्तुळामध्ये टीका सुरू झाल्या आहेत. अशातच शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी ट्वीट करत टीका केली आहे. “पक्षाने आपल्या वडिलांना मुख्यमंत्री केलं, आपल्याला मुख्यमंत्री केलं, प्रदेशाअध्यक्ष केलं… केवळ एक राज्यसभेच्या भाकर तुकड्यासाठी त्या पक्षाला धोका देण्यासाठी खरंच दगडाचं काळीज हवं.” अशी टीका केली आहे.