बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या संकटात बँकांकडून मदतीचा हात; कमी व्याजात असं मिळवा पर्सनल लोन

चीनच्या वुहानपासून सुरु झालेल्या कोरोना विषाणूचा प्रभाव आता संपूर्ण जगात जाणवत आहे. असे फारच कमी देश आहेत की ज्या देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव पहायला मिळत नाही. भारतातही कोरोनानं अक्षरशः थैमान घातलं असून लॉकडाऊन करुनही कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यात सरकारला यश आलेलं नाही. अशा वातावरणात अनेक संकटं तोंड वासून उभी आहेत.

जगभरातीलच नव्हे तर भारतातील अनेक उद्योगधंदे या जागतिक महामारीनं ठप्प झाले आहेत. अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे, तर काही जणांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार असून त्याही येत्या काळात जाऊ शकतात. जगभरातील अनेक देशांमध्ये अशीच स्थिती असून अनेकांचं रोजचं जगणं मुश्कील झालं आहे, संसाराचा गाडा हाकणं मोठं कसरतीचं होऊन बसलं आहे. अशा वातावरणातही लोकांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे.

रोजच्या जगण्यात संघर्ष करणाऱ्या नागरिकांसाठी थोडी का होईना चिंता दूर करणारी ही बातमी आहे. भारतीय बँका अशा लोकांसाठी देवासारख्या धावून आल्या आहेत. भारतातील काही महत्वपूर्ण बँकांनी एकत्र येत आपल्या ग्राहकांना या संकटात मदतीचा हात देण्याचं ठरवलं आहे. या बँकांनी ‘कोव्हिड 19’ पर्सनल लोनची सोय उपलब्ध करून दिली आहे, ज्यामध्ये अत्यंत कमी दरामध्ये ग्राहकांना वैयक्तिक कर्ज दिलं जाणार आहे.

एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅक या बॅकांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात या बँकांनी आपल्या ग्राहकांना माहिती देण्यास सुरुवात केली असून अनेकांना तर कर्जवाटपही झालं आहे. या कर्जाचं स्वरूप नेमकं कसे असेल याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

सर्वात महत्वाची बाब म्हणजे कोरोनाच्या आधी मिळत असलेल्या वैयक्तिक कर्जापेक्षा यावर अगदी कमी व्याज आकारलं जाणार आहे. एरवी 8.75 पासून अगदी 25 टक्के पर्यंत व्याज भरताना ग्राहकांचं अक्षरशः कंबरडं मोडत असे, मात्र आता फक्त 7.20 पासून 10.25 टक्के एवढ्या माफक दरातच कोव्हिड 19 कर्ज काढता येणार आहे.

तुम्ही वर नमूद केलेल्या बँकांचे ग्राहक असाल तर तुम्हाला या कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे. 25,000 पासून अगदी 5 लाख पर्यंतचे कर्ज काढण्याची सोय या अंतर्गत ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी तुमचं क्रेडिट लिमिट अर्थातच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण तुमची पत चांगली असेल तरच तुम्हाला कर्ज मिळतं हे तुम्हाला अर्थातच ठाऊक असेल.

आर्थिक अडचणीतील मदतीसाठी कर्ज योजना सुरू करण्यात आल्यानं याची परतफेड करण्याची मुदत 3 वर्ष असणार आहे. 3 वर्षाच्या कालावधीत कर्जाची पूर्ण रक्कम भरणं ग्राहकांना क्रमप्राप्त आहे. मात्र यासाठी ग्राहकांचे क्रेडिट प्रोफाईल व रेकाॅर्ड तपासून घेतले जाईल असं बँकांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे या कर्जावर प्रिपेमेंट शुल्कही आकारलं जाणार नाही. याचा अर्थ एखाद्या ग्राहकाने कर्ज काढून 6 महिन्याच्या आतच पूर्ण रकमेची परतफेड केल्यास यावर व्याज घेतलं जाणार नाही. ही या कर्ज योजनेची सर्वात आकर्षक बाब असून सध्या अडचणीत असलेल्या मात्र सहा महिन्याच्या आत पैसे भरण्याची क्षमता असणाऱ्या अनेकांच्या या कर्ज योजनेवर नक्कीच उड्या पडतील.

शहाण्यानं पोलीस ठाण्याची पायरी कधीच चढू नये, असं म्हणतात. आपल्याकडे बँकांच्या कर्जाबाबतही अशीच धारणा अनेकांमध्ये असलेली पहायला मिळते. विशेषतः  वैयक्तिक कर्ज न काढण्याचा सल्ला बहुतांश ठिकाणी आपल्याला मिळत असतो. सारासार विचार करता तो योग्य आहेच. मात्र अत्यावश्यक किंवा तातडीची गरज असेल तरच या कर्जाचे लाभ घेण्यात गैर नाही.

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या जात असताना, जवळ पुरेशी शिल्लक नसताना दिवस काढणं फार जिकीरीचं असतं. हे ज्याला अनुभवावं लागतं त्यालाच कळतं. त्यामुळे बँकांची दिलेली ही एक चांगली योजना म्हणता येईल. जवळपास वरील सर्वच बँकांमध्ये 30 जून पर्यंत या कर्जाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्हाला जर याबाबत अधिक माहिती हवी असेल तर वरील बँकांच्या तुमच्या जवळच्या शाखेतून तुम्हाला ती नक्कीच घेता येईल.

ट्रेंडिंग बातम्या-

‘उद्धव ठाकरे दाढी कुठं करतात?, केस कुठं कापतात?’; ‘या’ भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला

“मी दौरा केल्यामुळे मुख्यमंत्री अन् शरद पवारांना दौरा करावा लागला”

महत्वाच्या बातम्या-

निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत करा- शरद पवार

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांसाठी अजित पवारांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

कोरोनाच्या संकटकाळात उद्धव ठाकरेंच्या जागी कोणी दुसरं असतं तर…- जितेंद्र जोशी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More