Team India | अखेर ट्वेंटी-20 संघात रोहित-विराटची एन्ट्री; वर्ल्ड कपची तयारी सुरू?

Team India | भारताच्या ट्वेंटी-20 संघात मोठ्या कालावधीनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुनरागमन झाले आहे. अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांना वगळून बीसीसीआयने विराट-रोहितचे पुनरागमन केले. आगामी काळात जून महिन्यात ट्वेंटी-20 विश्वचषक होणार आहे. त्या दृष्टीनेच हे पाऊल टाकले असल्याचे बोलले जात आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियाला अफगाणिस्तानचा सामना करायचा असून त्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेतून भारताच्या ट्वेंटी-20 संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुनरागमन झाले आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला चाहत्यांना या निर्णयामुळे सुखद धक्का बसल्याचे दिसते. 2024 हे वर्ष ट्वेंटी-20 क्रिकेटचे असेल यात काही शंका नाही. कारण आयपीएलनंतर विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे. मागील वर्षी वन डे विश्वचषक पार पडला, त्यामुळे विराट आणि रोहित क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटपासून दूर होते. पण आता दोन्ही स्टार खेळाडू नोव्हेंबर 2022 नंतर या फॉरमॅटमध्ये परतत आहेत.

Team India च्या ट्वेंटी-20 संघात 14 महिन्यांनंतर एन्ट्री

अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेत भारताचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार की सूर्यकुमार यादव यावरून क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. मात्र, या सगळ्याचे उत्तर रविवारी 7 जानेवारीला मिळाले. सर्व अंदाज खरा ठरवत निवड समितीने दोन्ही दिग्गज खेळाडूंना संघात पुनरागमन करण्याची संधी दिली आहे. रोहित आणि विराट गेल्या 14 महिन्यांपासून या फॉरमॅटमधून बाहेर होते. तर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे या मालिकेचा भाग नाहीत. अशा परिस्थितीत निवडकर्त्यांना कर्णधारपदाचा निर्णय घेणे आणखी सोपे झाले आणि रोहित शर्माकडे ही जबाबदारी पुन्हा एकदा सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका आणि बीसीसीआयचा कालचा निर्णय महत्त्वाचा आहे. कारण हार्दिक पांड्याच्या तुलनेत रोहितला कर्णधारपदाचा अधिक अनुभव आहे, त्यामुळे बीसीसीआय ट्वेंटी-20 विश्वचषकात रोहितकडेच संघाची धुरा सोपवेल असे जाणकारांचे म्हणणे आहे. पण, वन डे क्रिकेटप्रमाणे आता विराट-रोहितच्या जोडीला भारतीय संघ व्यवस्थापन ट्वेंटी-20 क्रिकेटसाठी मोकळीक देणार का हे पाहण्याजोगे असेल. एकूणच भारताला विश्वचषकाच्या तयारीसाठी खूप कमी ट्वेंटी-20 सामने मिळणार आहेत. त्यात आयपीएलचा थरार… त्यामुळे आगामी काळातील काही घडामोडी भारतीय क्रिकेटच्या भवितव्यासाठी महत्त्वाच्या असतील.

अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, तिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मुकेश यादव, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.

अफगाणिस्तानचा संघ –

इब्राहिम झाद्रान (कर्णधार), रहमतुल्लाह गुरबाज, हशमतुल्लाह झाझाई, इब्राहिम अलिखिल, रहमत शाह, मोहम्मद नबी, एन. झाद्रान, के. जनात, ए. ओमरजाई, एस. अश्रफ, एम. रहमान, एफ. फारुखी, एफ. मलिक, नवीन उल हक, एन. अहमद, एम. सालेम, क्यू अहमद, राशिद खान आणि गुलबदीन नईब.

IND vs AFG ट्वेंटी-20 मालिका

पहिला सामना, 11 जानेवारी – मोहाली
दुसरा सामना, 14 जानेवारी – इंदूर
तिसरा सामना, 17 जानेवारी – बंगळुरू

Team India ची विजयी सलामी पण पाहुण्यांच कमबॅक; दुसऱ्या सामन्यात भारत चीतपट

Shakib Al Hasan बनला खासदार! विजयाचं सेलिब्रेशन अन् चाहत्याच्या दिली कानशिलात, VIDEO

Aditya Thackeray विदर्भाकडून मैदानात; रणजी ट्रॉफीचा थरार सुरू!

Kangana Ranaut चा पुन्हा एकदा जावेद अख्तरांशी पंगा?; ‘त्या’ प्रकरणी हायकोर्टात धाव

Aishwarya Rai-जया बच्चन यांच्यानंतर आलिया भट आणि सासू नितू कपूरचं बिनसलं?,व्हिडीओच आला समोर