राज ठाकरेंचे शिलेदार वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) मोठी गळती पाहायला मिळाली. शिवसेनेत फुट पडल्यानंतर राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र अनेक राजकीय घडामोडींदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच (MNS) सगळ्यात मोठा धक्का बसला आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर 10- 12 नाही पण तब्बल 400 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकलाय. मनसेला खिंडार तर पडलंच पण राज ठाकरेंचे (Raj Thackeray) अत्यंत विश्वासू मानले जाणारे वसंत मोरे (Vasant More) पण आता मनसेला जोरजार झटका देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय.

राज ठाकरेंनी मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांची पदावरुन हकालपट्टी केली. यानंतर माझिरेंनी तर मनसेचा राजीनामा दिलाच पण त्यांच्यासोबत तब्बल 400 कार्यकर्त्यांनी पण मनसेला जय महाराष्ट्र केला.

राज ठाकरेंच्या या निर्णयानंतर मनसेत मात्र चांगलीच उलथापालथ पाहायला मिळतीये. कारण, निलेश माझिरे हे वसंत मोरेंचे खंदे समर्थक आहेत. एकतर आधीपासूनच वसंत मोरेंच्या नाराजींच्या चर्चांनी जोर धरलाय. त्यात मोरेंच्या खंद्या समर्थकाची पदावरून हाकालपट्टी केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आलंय.

राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पुणे दौरा केला होता. त्यावेळीही मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याचं पाहायला मिळालं. निलेश माझिरे यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यामुळे मनसेतला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी देखील पक्षातील अंतर्गत कलहाबाबत नाराजी व्यक्त केली होती. वसंत मोरे मनसे सोडणार असल्याच्या चर्चाही काही महिन्यांपूर्वी रंगत होत्या. मात्र, आता पुन्हा एकदा याच चर्चा जोर पकडत आहेत आणि यावेळी कारण ठरतंय अजित पवारांनी (Ajit Pawar) वसंत मोरेंना दिलेली डायरेक्ट ऑफर.

नुकतंच पुण्यातल्या एका विवाह सोहळ्यात अजित पवार आणि वसंत मोरेंची भेट झाली. यावेळी अजित पवारांनी ‘तात्या, कधी येताय, वाट पाहतोय,’ असं म्हणत वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची थेट थेट ऑफरच दिली.

मनसेचा पुण्यातला आक्रमक आणि प्रमुख चेहरा म्हणून वसंत मोरेंची ओळख आहे. अनेकदा वसंत मोरेंनी पक्षाबद्दलची नाराजी उघडपणे जाहीर केली. त्यानंतर वसंत मोरे मनसे सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याचंही म्हटलं जात होतं. त्यात अजित पवारांनी वसंत मोरेंना दिलेली डायरेक्ट ऑफर यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

वसंत मोरे यांनीही अजित पवारांनी राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्याचं मान्य केलंय. पण हो यासोबतच त्यांनी मनसेला सोडून कुठंही जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र, महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं पाहिलं तर वसंत मोरेंसारखा नेता आपल्या गटात यावा यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरूयेत. अर्थात याचाच एक भाग म्हणून आता अजित पवारांनी वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान, वसंत मोरे त्यांच्या पक्ष न सोडण्याच्या निर्णयावर ठाम असले तरी मनसेतली अंतर्गत गटबाजी, नाराजी काही लपून नाही. त्यामुळे वसंत मोरे त्यांच्या निर्णयावर खरंच ठाम राहतील की त्यांच्या रूपाने राज ठाकरेंना मोठा धक्का बसेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-