IND vs AFG | बलाढ्य टीम इंडियाला अफगाणिस्तानने फोडला घाम, डबल सुपर ओव्हरपर्यंत नेला सामना

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs AFG | भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेतील अखेरचा सामना अविस्मरणीय झाला. कर्णधार रोहित शर्माची शतकी खेळी आणि रिंकू सिंगच्या स्फोटक खेळीच्या जोरावर यजमान भारताने 200 पार धावसंख्या पोहचवली होती. (India vs Afghanistan 3rd T20I Result) प्रत्युत्तरात पाहुण्या अफगाणिस्तानने बलाढ्य भारताला कडवे आव्हान दिले. अखेर सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहचला. टीम इंडियाने 2024 च्या ट्वेंटी-20 विश्वचषकापूर्वी आपल्या शेवटच्या मालिकेत रोमहर्षक विजय नोंदवला. बंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात डबल सुपर ओव्हर झाली, जिथे टीम इंडियाने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानचा 10 धावांनी पराभव केला.

भारतीय कर्णधार रोहित शर्माचे विश्वविक्रमी पाचवे शतक (नाबाद 121 धावा) आणि दोन्ही सुपर ओव्हरमध्ये स्फोटक फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने यश मिळवले. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रवी बिश्नोईने अफगाणिस्तानचे अवघ्या 3 चेंडूत 2 बळी घेत संघाला यश मिळवून दिले. अशा प्रकारे टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 3-0 असा दारूण पराभव केला. टीम इंडियाने विक्रमी नवव्यांदा ट्वेंटी-20 मालिकेत अफगाणिस्तानला चीतपट केले.

अफगाणिस्तानचे कडवे आव्हान

भारतीय संघाने अफगाणिस्तानला मालिकेतील तिन्ही सामन्यात पराभूत केले आणि 3-0 ने मोठा विजय मिळवला. यासह टीम इंडिया आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 मध्ये सर्वाधिक 9 वेळा क्लीन स्वीप करणारा संघ बनला आहे. याआधी भारत आणि पाकिस्तानने 8-8 वेळा असे केले होते. अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, ज्यामुळे चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले.

 

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. रोहितच्या षटकारांच्या पावसाआधी खऱ्या पावसाने देखील बॅटिंग केली. पाऊस थांबल्यावर धावांचा पाऊस सुरू झाला. बुधवारी दोन्ही संघांनी उत्कृष्ट फलंदाजी आणि काही खराब गोलंदाजी झाली, परंतु प्रेक्षकांसाठी हा सामना खरोखरच पाहण्याजोगा ठरला. पूर्ण 40 षटकात 400 पेक्षा जास्त धावा झाल्या, ज्याने देखील सामन्याचा निकाल लागला नाही.

IND vs AFG तिसऱ्या सामन्याचा थरार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एकाच सामन्यात 2 सुपर ओव्हर खेळल्या गेल्या, ज्यात भारतीय संघाने विजय प्राप्त केला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अखेरच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. पण, टीम इंडियाने अवघ्या 22 धावांत 4 गडी गमावल्यानंतर रोहित आणि रिंकूने डाव सावरला.

विराट कोहली आणि संजू सॅमसन ‘गोल्डन डक’वर बाद झाले. रोहित शर्मा सुरुवातीला खूप संघर्ष करताना दिसला पण रिंकू सिंगसोबत त्याने जबाबदारी स्वीकारली आणि शतकी खेळी केली. रोहित शर्माने ६९ चेंडूत ८ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने १२१ धावांची नाबाद शतकी खेळी केली. तर, रिंकू सिंगने ६ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने नाबाद ६९ धावा कुटल्या. या दोघांनी अवघ्या 95 चेंडूत 190 धावांची नाबाद भागीदारी करत टीम इंडियाला 212 धावांपर्यंत नेले. दोघांनी शेवटच्या 5 षटकात 103 धावा जोडल्या, त्यापैकी 36 धावा फक्त 20 व्या षटकात आल्या. प्रत्युत्तरात, अफगाणिस्तानने सांघिक खेळी करत सामना सुपर ओव्हरपर्यंत नेला. मोहम्मद नबीने १६ चेंडूत ३४ धावांची स्फोटक खेळी करून भारताला कडवे आव्हान दिले. अफगाणिस्तानला शेवटच्या षटकात 19 धावांची गरज होती. हे षटक टाकण्यासाठी मुकेश कुमार आला आणि गुलबदीनसह शराफुद्दीन अश्रफने 18 धावा करून सामना बरोबरीत संपवला.

पहिल्यांदाच डबल सुपर ओव्हर

यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला जिथे अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 16 धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल फलंदाजीला आले पण टीम इंडियाला देखील केवळ 16 धावा करता आल्या आणि सुपर ओव्हर देखील बरोबरीत संपली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एकाच सामन्यात डबल सुपर ओव्हर पाहायला मिळाली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने प्रथम फलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्माने पहिल्या 3 चेंडूत 11 धावा केल्या पण पुढच्या 2 चेंडूत भारताने 2 विकेट गमावल्या. अशा प्रकारे अफगाणिस्तानला 12 धावांचे लक्ष्य मिळाले. या सुपर ओव्हरमध्ये भारताकडून रवी बिश्नोई आला आणि त्याने अफगाणिस्तानला केवळ 1 धावांवर रोखले. बिश्नोईने 3 चेंडूत 2 बळी घेत संघाला 10 धावांनी विजय मिळवून दिला.

News Title- Team India defeated Afghanistan by 10 runs in the second Super Over
महत्त्वाच्या बातम्या –

Benefits of clove | सर्दी-खोकल्याच्या त्रासाने त्रस्त आहात?, मग करा ‘हा’ उपाय

Rashmika Mandanna च्या चाहत्यांना मोठा धक्का; लग्नाबाबत घेतला मोठा निर्णय?

Ram Mandir | रामनगरीला आनंद गगनात मावेना; अयोध्येत परतले स्वयं ‘राम-सीता’ आणि लक्ष्मण

प्राणप्रतिष्ठापणेपूर्वी मोदींना खुणावतेय ‘यांची’ कमी; आठवणीने झाले व्याकुळ

धर्मेंद्र-हेमा मालिनीच्या लेकीच्या आयुष्यात मोठं वादळ; अफेअरबद्दल धक्कादायक गोष्टी आल्या समोर