रूपाली चाकणकरांच्या बुद्धीचीच किव येते, कारण त्यांनी…”, जितेंद्र आव्हाड संतापले

Jitendra Awhad | सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अजित पवार गट आपल्याला घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी मिळाली असल्याचा प्रचार करत आहे. तर दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून केला जात आहे. अशातच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली. ‘माहेरी किती लुडबूड करावी, याला देखील मर्यादा असतात’, चाकणकरांच्या या विधानाचा दाखला देत आव्हाडांनी त्यांना लक्ष्य केले.

जितेंद्र आव्हाड सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणाले की, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी सुप्रियाताईंबद्दल बोलताना, ‘माहेरी किती लुडबूड करावी, याला देखील मर्यादा असतात’, असे म्हणत तमाम स्त्री वर्गाचा अपमान केला आहे. आजच्या काळात स्री-पुरुषांमध्ये भेद राहिलेतच कुठे अन् हे भेद नष्ट व्हावेत, यासाठी तर लढाई सुरू असते. शरद पवार यांनी महिलांना दिलेले 50 टक्क्यांचे आरक्षण कशासाठी होते? राजकारणात मिळालेली संधी कशासाठी होती? याचे उत्तर आहे की, महिलाही पुरूषांइतक्याच कर्तबगार असतात आणि त्यांची कर्तबगारी सिद्ध करता यावी, या भावना शरद पवार यांच्या होत्या आणि आहेत.

चाकणकरांच्या त्या विधानावरून वाद

तसेच त्याच शरद पवार साहेब यांच्या मदतीसाठी त्यांच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी जर सुप्रियाताई लढत असतील, संघर्ष करीत असतील तर त्यास ‘लुडबूड’ म्हणून संबोधल्याने रूपाली चाकणकर यांच्या बुद्धीचीच किव येते. एखाद्या मुलीला ती केवळ मुलगी आहे अन् ती सासरी गेली आहे, म्हणून तिचा माहेरचा अधिकार नाकारणे, हा प्रकार राजर्षी शाहू महाराज आणि क्रांतीबा जोतिराव फुले- सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा अपमानच आहे, असेही आव्हाडांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, जर आपले असे विचार असतील तर यापुढे किमान महात्मा जोतिबा आणि सावित्रीमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार तरी अर्पण करू नका. जर हजारो वर्षांपूर्वीचे हे जुनाट विचार तुमचे असतील आणि स्री-पुरूष भेदभाव तुम्ही आजही मानत असाल तर तुमची किवच करावीशी वाटते. केवळ ती मुलगी आहे, म्हणून तिचे अधिकार नाकारणाऱ्या जमान्यातील तुम्ही आहात. पण, आमच्यासारखे वंशाला दिवा आहे किंवा नाही, असा विचार न करता, एका मुलीवरच समाधान मानून तिलाच सर्व अधिकार देणारे आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे.

 

Jitendra Awhad यांची टीका

“जेवढं कौतुक आईपुढे ढाल म्हणून उभे राहणाऱ्या राहुल यांचे केले जाते. तेवढेच कौतुक आम्हा सर्वांना सुप्रियाताईंविषयी आहे. ज्या मुलीच्या बापाने आपुलकीने ज्या स्वकियांना आणि परकियांना मोठे केले आणि ज्यांना मोठे केले. त्यांच्याकडूनच ‘तिच्या’ पित्याला घाव सोसावे लागत आहेत. अशा वादळात… रणसंग्रामातही सुप्रियाताई समर्थपणे खडकाप्रमाणे उभ्या राहून संघर्ष करीत आहेत. ही जिजाऊंची लेक आहे, ही अबला नारी नाही”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी चाकणकरांना प्रत्युत्तर दिले.

याशिवाय सासर आणि माहेर या कल्पना आता इतिहासजमा झाल्या आहेत. दुर्दैवाने आपण ज्या आयोगाच्या अध्यक्षा आहात. त्या आयोगाच्या प्रमुख असतानाही आपण अशा भेदभावाच्या भावना बाळगत असाल तर स्री अत्याचाराविषयी आपल्या काय भावना असतील, याचा विचारच न केलेला बरा. असो, यापेक्षा अधिक काही लिहिण्यात काही अर्थ नाही, असे आव्हाडांनी आणखी म्हटले.

News Title- MLA Jitendra Awad criticized Women Commission Chairperson Rupali Chakankar
महत्त्वाच्या बातम्या –

बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, अजित पवार-पंकजा मुंडे अडचणीत सापडणार?

मोठी बातमी! अभिनेेत्री राखी सावंतच्या अडचणीत वाढ

अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; फोटो तुफान व्हायरल

‘पवारांचा बदला घ्यायची हीच वेळ’; विजय शिवतारेंनी घेतली ‘या’ नेत्याची भेट

मनोज जरांगे पाटलांना दिलासा देणारी बातमी समोर!