15 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी जमा, मुख्यमंत्र्यांचा दावा

कराड | 15 लाख 42 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कालच कर्जमाफीचे 6 हजार कोटी रुपये जमा केलेत, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. प्रीतिसंगमावर यशवंतरावांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. 

यशवंतरावांनी महाराष्ट्राला आकार देताना शेतकरी आणि वंचितांच्या विकासाचे स्वप्न पाहिले. ते स्वप्न अद्याप पूर्ण झाले नसले तरी राज्य सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे, असं फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची प्रेरणा घेऊन मी याठिकाणावरुन निघालो आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.