बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये पुन्हा दहशतीचं वातावरण, लोकांना या गोष्टीची वाटतेय भीती

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेला कोरोनाचा प्रकोप जगभर झाला. अमेरिका व युरोपातील राष्ट्रांत कोरोनानं असं काही थैमान घातलं की, आरोग्य प्रशासन व सरकार घाईला आलं. एकीकडे जगभर कोरोनाचं संक्रमण वाढत असताना चीन मात्र कोरोनाच्या संकटातून सुखरूप बाहेर पडला.

 

कोरोनाला आटोक्यात आणण्यात चीननं चांगलच यश मिळवलं. कोरोनावर मात करण्यासाठी चीनच्या नीतीचा वापर करा, अशा आणाभाकाही झाल्या. मात्र आता चीनमधील कोरोनाच्या डोकेदुखीनं पुन्हा डोकं वर काढलं आहे. पण यावेळेस वुहान नव्हे तर चीनच्या या प्रसिद्ध शहरात कोरोना हातपाय पसरू लागलाय.

बीजिंग शहरातील ‘सी फूड व मांस’ बाजारातून हा कोरोना आता देशाला विळखा घालू लागलाय. या बाजाराच्या परिसरात अत्यंत दमट व कमी तापमान असल्यानं कोरोनाचं या वातावरणात चांगलच फावलं आहे, असं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

अहवालानुसार, कोरोनाचे हे नवे बाधीत रूग्ण ‘शिनफेडी फूड सेंटर’ भागात आढळून आल्याचं समोरं आलं आहे. या भागात दाटीवाटीनं अनेक गोदाम व ट्रेडिंग हाॅल पहायला मिळतात. मांसविक्रीची ही सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाते. मात्र या भागात कोरोना बाधितांचा आकडा आता १०० च्या वर गेला आहे. या कोरोना संक्रमणाचा वेग भविष्यात वेगानं वाढू शकतो, असंही आता सांगितलं जात आहे.

चीनचे Center of Diseases Control & Prevention चे प्रमुख वु जुनयू यांच्या मते, कोरोना संक्रमित झालेले हे नवे रूग्ण शहरातील ‘शिनफेडी मार्केट’ मध्ये काम करतात. बहुतांश सर्वजणच सिफूड व मांस विकण्याचं काम करत असतात. या भागात नेहमीच दाटीवाटी असल्यानं कोरोना विषाणूचं संक्रमण वेगानं होण्याचा धोकाही बराच वाढला आहे.

युरोपातील समुद्री जीव मोठ्या प्रमाणात चीनमध्ये आयात केले जातात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ही आयात बंद करण्यात आली होती. मात्र शिनफेडी मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात कच्च मांस खाण्यासाठी लोक अद्याप गर्दी करत आहेत.

स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, शहरातील हा बाजार अत्यंत गलिच्छ समजला जातो. खराब मांस मिळण्याची खूप मोठी साखळी याच भागात कार्यरत आहे. जंगली जनावरांचं मांसही या भागात विकलं जात. या सगळ्या प्रकारामुळे अनेक जीवघेण्या व्हायरसचा या भागात उद्रेक होत असतो.

दरम्यान, चीन मधील कोरोना बाधीतांचा आकडा ९० हजारांच्या घरात जाऊन पोहचला आहे. पाठीशी अनुभव असल्यानं चीन कोरोनाला तगड आव्हान देत असला तरी, कोरोना संक्रमितांच्या आकड्यातही वेगानं वाढ होत आहे. चीनमधील कोरोना संक्रमणाचा हा दुसरा टप्पा असल्याचंही काही जाणकार सांगतात.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More