बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता; प्रत्येकानंच ‘या’ 6 गोष्टी तपासून पाहा!

मुंबई | वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याचे स्पष्‍ट संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिले. लॉकडाऊनबाबत नियोजन करण्यासाठी तसेच हा लॉकडाऊन किती दिवसांचा असावा यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यानंतर निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी दोन दिवसांचा वेळ मागून घेतला होता. लॉकडाऊनसाठी विरोधी पक्षानंही सहकार्य करायचं मान्य केल्यानं आता लॉकडाऊन लागणारच आहे. मात्र त्याआधी काही गोष्टीची तयारी प्रशासनाला करावी लागणार आहे आणि सरकार म्हणून या गोष्टी तपासून पाहणं सरकारचं काम आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले असले तरी तडकाफडकी सर्व गोष्टी बंद केल्या जाणार नाहीत. लोकांना त्यासाठी पुरेसा वेळ दिला जाऊ शकतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात मागे एकदा भाष्य केलं होतं. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचं अजिबात कारण नाही. फक्त काही गोष्टींची काळजी घेतली, तर या लॉकडाऊनमध्ये आपल्या जास्त त्रास होणार नाही.

कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?-

 

१.जीवनावश्यक वस्तूंचा पुरेशा हव्या-

लॉकडाऊन किती दिवसांचा लागणार याबाबत अद्याप तरी पुरेशी स्पष्टता नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ८ दिवसांच्या कडक लॉकडाऊनसाठी आग्रही आहेत, तर प्रशासनाच्या मते १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची महाराष्ट्राला गरज आहे. त्यामुळे किमान १५ दिवस पुरतील इतक्या जीवनावश्यक वस्तू घरात असायला हव्यात. जेवढ्या हव्यात तेवढ्यात घ्यायला हवं नाहीतर काही लोक साठेबाजी करतात आणि त्यामुळे समाजातील इतर घटकांना त्याचा त्रास होतो, त्यामुळे जास्त प्रमाणात नव्हे मात्र पुरेशा प्रमाणात अशा वस्तू घरात ठेवायला हव्यात.

२. औषधं आणि प्रथमोपचार साहित्य-

काही घरांमध्ये लहान मोठे आजार असलेले लोक असतात. आजारपण तेवढं मोठं असेल तर प्रशासन लॉकडाऊनमध्येही रुग्णालयात जायला परवानगी देईल, मात्र छोट्या छोट्या गोष्टींसाठी तसेच औषधांसाठी बाहेर जायला लागू नये यासाठी काळजी घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने अशी औषधं घरात ठेवा जेणेकरुन गरजेच्या वेळी बाहेर पडण्याची वेळ येणार नाही.

काही जणांना रोज किंवा काही ठराविक दिवसांनी औषधं चालू असतात. अशा लोकांनीही काळजी घ्यायला हवी. आपल्याला आवश्यक औषधं पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत की नाही याची खात्री करुन घ्यायला हवी. घरात वृद्ध लोक तसेच लहान मुलं असतील तर त्यांच्या औषधांची काळजी घरातील इतर सदस्यांनी घ्यायला हवी.

३. बँका तसेच सरकारी कामं उरकून घ्या-

तुमची बँकेत किंवा सरकारी कार्यालयांमध्ये काही महत्त्वाची कामं असतील तर आत्ताच उरकून घ्या, कारण एकदा लॉकडाऊन लागल्यानंतर ही कामं होणं अवघड आहे. अशा परिस्थितीत फारच गरजेची कामं असतील तर ती लॉकडाऊन लागण्याची आधी करा आणि कामं तेवढी महत्त्वाची नसतील तर ती लॉकडाऊनच्या नंतर ढकला.

आता यूपीआय सेवेद्वारे कुणालाही पैसे झटकन देता येतात, मात्र आपल्याजवळ पुरेशा प्रमाणात रोख रक्कम आहे का याचीही खात्री करा. कारण आजकाल यूपीआयमुळे अनेकांना आपल्या खिशात किती पैसे आहेत किंव नाही? याचा अजिबात थांगपत्ता नसतो. मात्र गरज पडल्यावर बाहेर पडून पैसे काढणं अवघड बनू शकतं. त्यामुळे आताच या गोष्टीचा विचार करुन ठेवा. अनावश्यकरित्या जास्त पैसे काढणंही टाळा.

४. बाहेरगावी असाल तर किंवा प्रवासाचा प्लॅन असेल तर-

लॉकडाऊन लागण्याच्या आधी कामानिमित्त किंवा इतर काही गोष्टींसाठी काही लोक बाहेरगावी असू शकतात. अशावेळी तिथं राहण्याची व्यवस्था असेल तर ती पाहणं किंवा सरकारनं दिलेल्या वेळेपर्यंत प्रवास पूर्ण करुन घरी पोहोचणं महत्त्वाचं आहे.

ज्याअर्थी लॉकडाऊन लागणार असल्याचं बातम्यांमधून तसेच सरकारच्या माध्यमातून समजत आहेत, त्याअर्थी यापुढे प्रवासाचे बेत रद्द करायला हवेत, किंवा कुणी बाहेर असेल तर त्यांनी त्यासंदर्भात योग्य निर्णय घ्यायला हवा.

५. कामाबद्दल तसेच ओळखपत्राबद्दल-

कोरोनामुळे अनेकांना सध्या वर्क फ्रॉम होम दिलेलं आहे किंवा लॉकडाऊन लागल्यानंतर काही कंपन्यांच्या कामगारांना वर्क फ्रॉम होम दिलं जाऊ शकतं, त्यामुळे अशा परिस्थितीत लागणाऱ्या सर्व गोष्टी किंवा साहित्य आपल्याकडे आहे ना याची चाचपणी करायला हवी. अनेकांना इंटरनेट कनेक्शन लागू शकतं. ते घेतलं नसेल तर लवकर घ्यायला हवं किंवा असेल तर स्पीड वगैरे गोष्टी व्यवस्थित आहेत ना? याची चाचपणी करायला हवी.

आपण अत्यावश्यक सेवांमध्ये असाल तर आपल्याला कामावर हजर रहावं लागू शकतं. अशावेळी संबंधित आस्थापनेनं दिलेलं अधिकृत ओळखपत्र किंवा पत्र आपण जवळ बाळगायला हवं. पोलिसांनी रस्त्यात अडवल्यानंतर किंवा विचारणा केल्यानंतर या गोष्टी दाखवायला हव्यात. त्यामुळे या गोष्टी आपल्याकडे आहेत का? याची खात्री करायला हवी. नसतील तर त्या मिळवायला हव्यात.

६. सरकारी सूचना व्यवस्थित वाचून समजून घ्या-

लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सरकारी सूचना जारी होते. घाबरुन न जाता किंवा इतर कुठल्याही गोष्टींवर विश्वास न ठेवता या सरकारी सूचना व्यवस्थित वाचून घ्या, त्या समजून घ्या आणि त्यानूसार वागा, कारण कोरोना या महामारीविरोधात आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन लढायचं आहे. सरकारी सूचनांचं पालन करणं त्यासाठीच गरजेचं आहे.

सरकारचं अधिकृत संकेतस्थळ किंवा सरकारी सोशल मीडिया खात्यांद्वारे ही माहिती तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकते. तसेच जिल्हा माहिती कार्यालयाकडूनही यासंदर्भात सूचना सोशल मीडियावर शेअर केल्या जातात. तिथून आपण योग्य माहिती नक्कीच घेऊ शकतो. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये घरातच राहा, अत्यावश्यक कारणांशिवाय चुकूनही घराबाहेर पडू नका.

थोडक्यात बातम्या-

रेमडेसिवीर इंजेक्शन वितरणासाठी नियंत्रण कक्ष सुरु; ‘या’ क्रमांकावर संपर्क करुन मिळवा इंजेक्शन

“अडवानी गांधीनगरचे खासदार होते म्हणून भाजपने 6 वेळा माझं तिकीट कापलं”

मुख्यमंत्र्यांचं ठरलं; महाराष्ट्रात 8 दिवसांचा कडक लाॅकडाऊन?

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा दावा, खरं कारण समोर आल्यावर पोलिसही हादरले

आयटी कंपनीतील तरुणीला गुंगीचं औषध देऊन कॅब चालकाने केला ‘हा’ प्रकार; पुण्याला हादरवणारी घटना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More