नागपूर पोलीस म्हणतात, “मुन्ना यादव आमच्यापेक्षा फास्ट!”

नागपूर | भाजप नेता मुन्ना यादव पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार आहे. त्याला शोधण्याऐवजी पोलीस वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचं समोर आलंय. 

फरार आरोपींना शोधण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो. मुन्ना यादवच्याही शोधात आहोत, मात्र तो आमच्यापेक्षा फास्ट आहे, असं सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी म्हटलंय. आमच्यावर कुणाचा दबाव नाही, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

मारहाणीच्या एका प्रकरणात मुन्ना यादव फरार आहे. याप्रकरणी हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांची कोंडी केली होती. मात्र पोलीस याप्रकरणी गंभीर नसल्याचं दिसतंय. दरम्यान, यासंदर्भात प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला तुमचा हिशोब पक्का आहे, असं सह पोलीस आयुक्तांनी म्हटल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.