पंकजा मुंडेंचा स्तुत्य उपक्रम; महिला बचत गटांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी परदेश दौरा!

न्युयाॅर्क | ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यांची सध्या चांगलीच चर्चा आहे.

ग्रामीण बचतगटांच्या महिलांद्वारे उत्पादीत वस्तुंचे अमेरिकेत प्रदर्शन करण्यासाठी तसंच बचत गटांच्या महिलांना विविध नामवंत संस्थांना भेटी देऊन जागतिक स्तरावरील उद्योजकतेचीही माहिती देण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

अमेरिकेतील बोस्टन, न्युयॉर्क, सॅनफ्रान्सिस्को येथील एमआयटी, स्टँडफोर्ट विद्यापीठ, फेसबूक आदी संस्थांना या समुहानं भेटी दिल्या असून तिथं चालणारा व्यवसाय समजुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची वैशिष्ट्यं असलेली वस्त्र उत्पादने, इथली खाद्यसंस्कृती, हातमाग उत्पादनांविषयी अमेरिकेतील नागरीकांना विशेष आकर्षण आहे. याचा उपयोग महाराष्ट्रातील बचतगटांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी कशा पद्धतीने करता येईल, या विषयांची चर्चा या भेटीत करण्यात आली आहे.