रवींद्र धंगेकरांना शेवटी राज ठाकरेंचीच मदत घ्यावी लागली!

पुणे | मनसे सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना भाजपवर टीका करण्यासाठी अखेर राज ठाकरे यांचीच मदत घ्यावी लागलीय. राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांच्या मदतीने नोटाबंदीच्या मुद्द्यावरुन धंगेकरांनी मोदींवर निशाणा साधला. पुण्यातील रस्त्यांवर हे पोस्टर्स झळकत आहेत. 

रवींद्र धंगेकरांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. खासदार संजय काकडे त्यासाठी आग्रही होते. मात्र गिरीश बापट यांनी जोरदार विरोध केल्याने धंगेकरांना काँग्रेसचा हात धरावा लागला. 

दरम्यान, ज्या भाजपमध्ये जाण्याची धंगेकरांची मनिषा होती त्याच भाजपवर आज धंगेकरांना टीका करावी लागतेय. तर ज्या मनसेला त्यांनी सोडचिठ्ठी दिली त्याच मनसे प्रमुखांच्या व्यंगचित्राचा टीका करण्यासाठी वापर करावा लागतोय.