वाभाडे काढून शिवसेना म्हणते, “आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत!”

मुंबई | कोरेगाव भीमा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. तरीही आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सोबत आहोत असं या अग्रलेखात म्हटलं गेलंय.

राज्यात घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. उथळ राजकारणाला उकळी फुटली असून सावध राहा, असं शिवसेनेनं म्हटलंय. 

काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात?

-महाराष्ट्रात सर्व काही आलबेल आहे असे ज्यांना वाटते ते मूर्खांच्या नंदनवनात विहार करीत आहेत. तिसऱ्या दिवशीही काही ठिकाणी आगी पेटल्या, तर काही ठिकाणी आधीच पेटवलेल्या आगीचा धूर निघत आहे. दगडफेक आणि रस्त्यावर येऊन वाहतुकीचा खोळंबा करण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.

-प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेला ‘बंद’ शांततेत पार पाडला असता तर एक पुढारी म्हणून त्यांचे वजन नक्कीच वाढले असते. तसे झाले नाही. उलट बौद्ध समाजातील काही भडक डोक्याचे लोक प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अधिकच दिशाहीन झाले आहेत व ते आता नक्षलवाद्यांची भाषा बोलू लागले आहेत.

-कोल्हापूरच्या रुकडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना काही भडक डोक्याच्या लोकांनी केली. त्यातून त्या भागात तणाव वाढला आहे.

-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र समृद्धीच्या महामार्गाने जाताना दिसत नसून तो जातीय अराजक व विनाशाच्या खड्ड्यात पडताना दिसत आहे. या क्षणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहोत.

-रामदास आठवले यांना ‘टार्गेट’ करण्याचे कारस्थान असल्याचा आरोप अविनाश महातेकरांसारखे नेते करतात तेव्हा आश्चर्य वाटते.

-महाराष्ट्र जळत असताना ‘भाजप’चे ‘जी हुजूर’ झालेले रामदास आठवले हे दिल्लीच्या थंडीत गारठून गेले होते. राज्यात पेटलेल्या शेकोटीचे चटके आज त्यांना उबदार वाटत असले तरी प्रकाश आंबेडकर यांनी बौद्ध समाजात पेरलेले सुरुंग फुटू लागले आहेत व आंबेडकरी जनतेचे ऐक्य पुन्हा एकदा फुटीच्या कड्यावर आहे.

-मुख्यमंत्री संयमाने वागले याचे कौतुक सुरू आहे, पण हा संयम ते इतर वेळी दाखवत नाहीत. दंगलखोरांचा बीमोड करण्यासाठी त्यांनी जो संयम दाखवला, त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे शेकडो कोटींचे नुकसान झाले. डबघाईस आलेल्या एसटीचेच २५ कोटींचे नुकसान झाले.

-जिथे संयम दाखवायला हवा तिथे शौर्य दाखवायचे व शौर्याची तुतारी फुंकायची तिथे संयम दाखवायचा याला राज्य करणे म्हणत नाहीत. या सर्व दंगल प्रकरणातून भारतीय जनता पक्षाला राजकीय लाभ होईल की आणखी कुणाचे राजकीय भले होईल या हिशोबाची ही वेळ नाही.

-महाराष्ट्राचे गृहखाते एकसंध राहिलेले नाही व तिथे राजकीय फायद्यातोट्याच्या गणिताचा तास सुरू झाला आहे. गृहखाते हा राज्याचा आणि देशाचा कणा असतो. तोच ठिसूळ झाला तर राज्य मोडून पडेल.

-राज्य मनाने दुभंगले आहे. 1818 मध्ये भीमा-कोरेगावात पेशव्यांचा पराभव झाला. तो पराभव छत्रपतींच्या राज्याचा होता. फडणवीस, मग आता तरी वेगळे काय झाले आहे? उथळ राजकारणाला उकळी फुटली आहे, सावधान!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या