बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भर चौकात तरुणाला मारणं जिल्हाधिकाऱ्यांना पडलं महागात; थेट मुख्यमंत्र्यांनी तरूणाची माफी मागत केली ‘ही’ कारवाई

रायपुर | भर चौकात एका तरुणाला मारणं छत्तीसगडमधील सूरजपुरच्या जिल्हाधिकार्‍यांना चांगलंच महागात पडलं आहे. घडलेल्या घटनेनुसार एक तरुण आपल्या दुचाकीवरून लाॅकडाऊन दरम्यान काही अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडला होता. त्याचवेळी सुुरजपुरचे जिल्हाधिकारी रणविर शर्मा हे तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी करत होते.

वाहनांची तपासणी करत असताना हा तरुण आपलं कारण सांगतो व त्याला सुरुवातीला जिल्हाधिकारी साहेब जायला सांगतात. परंतु, अचानक ते गाडीत बसता-बसता परत येतात आणि त्या तरुणाला तु व्हिडिओ शूटिंग करत आहेस, असं म्हणत त्याचा मोबाईल फोडून टाकतात. त्यानंतर ते त्या तरुणाच्या कानशिलात देखील लगावतात.

संबंधीत तरुण हा विनवणी करत असतो तसेच मी कोणत्याही प्रकारचं शूटिंग केलेलं नाही, असे देखील म्हणतो. तरीही जिल्हाधिकारी साहेब त्यांच्या सुरक्षारक्षक असलेल्या कर्मचाऱ्यांना व पोलिसांना या तरुणाला मारण्याचे आदेश देतात. पोलिसही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मानत या तरुणाची बेदम धुलाई करतात. आज सकाळपासून समाजमाध्यमांवर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

दरम्यान, यासंबंधी जिल्हाधिकारी रणविर शर्मा यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, सुरुवातीला हा तरुण म्हणाला मी लस घेण्यासाठी जात आहे पण त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आढळून आली नाही. तसेच त्यानंतर त्याने आजीकडे जात असल्याचं कारण सांगितलं. तो खोटं बोलत होता हे लक्षात आल्यामुळे रागात येऊन मी त्याला मारलं हे माझं चुकलं हे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं.

या सर्व घटनेची माहिती छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ या मुजोर अधिकाऱ्याविरोधात कारवाई करत सुरजपुरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांना आपल्या पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची कोणतीही वागणूक नागरिकांना देऊ नये, असं आवाहनही केलं आहे. याबरोबरच ट्विट करून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी त्या तरुणासह त्याच्या कुटुंबीयांची माफी देखील मागितली आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या – 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More