महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरे यांच्या ‘वाईन शॉप्स सुरु करा’ या मागणीचा व्यसन मुक्ती मंचाकडून निषेध

मुंबई | कोरोना विषाणु संसर्ग आपत्कालीन परिस्थितीत देशभर सुरु असलेल्या लॉक डाऊनच्या सक्तीमधे महाराष्ट्र राज्याने महसुल मिळविण्यासाठी दारुची दुकाने व हॉटेल सुरु करावीत अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आम्ही अशा मागणीचा निषेध करतो व आमचा त्याला विरोध व्यक्त करतो असे व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचातर्फे काढलेल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

कोरोनाच्या ह्या संकट काळात, सर्वत्र लॉक डाऊन असल्याने सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. साहजिकच सरकारच्या तिजोरीत येणारा आर्थिक स्त्रोतही रोडावला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करण्याचे आवाहन सरकारकडून वारंवार केले जात आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारी तिजोरीची गंगाजळी वाढवण्यासाठी सरकारने या काळात अत्यावश्यक सेवांशिवाय इतर सर्वांसह बंद ठेवलेले वाईन शॉप्स् सुरू करावेत अशी विनंती वजा मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ती सर्वथा अयोग्य व आम्हाला अमान्य आहे, असं पत्रकात म्हटलं आहे.

अशा चुकीच्या मागणी वरुन जर ह्या लॉक डाऊनच्या काळात दारूची दुकाने ठराविक काळासाठी का होईना उघडली आणि तळीरामांनी शारीरिक अंतर ठेवून दारू खरेदी सुरू केली तरी ते लॉक डाऊनच्या शिस्तीचा व नियमांचा फज्जा उडविण्याची शक्यता अधिक आहे. तसेच त्यांच्यामुळे कुटुंबात, समाजात भांडणे वाढतील अशी शक्यता आहे. तसेच त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणखी बिकट होईल. अगोदरच पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण आहे, त्यात आणखी मोठी भर पडेल, असं मत व्यसन मुक्ती मंचाने नोंदवलं आहे.

लॉक डाऊनच्या काळात अनेक कुटुंबांमध्ये दोन वेळचे जेवण मिळण्याची भ्रांत आहे. अजून पुढे किती दिवस ही परिस्थिती राहील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घर खर्चासाठी राखुन ठेवलेली रक्कम लोक दारूच्या खरेदीसाठी वापरतील आणि एका माणसाच्या चैनीसाठी, सर्व कुटुंबाला वेठीला धरले जाईल. कोरोना विषाणू संसर्ग आपत्कालीन परिस्थितीमुळे जसे सरकार आर्थिक अडचणीत येणार आहे, त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात सामान्य जनतेलाही आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे असे आमचे विनम्र आवाहन आहे, असं व्यसन मुक्ती मंचाने म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा कधी होणार?, उदय सामंत म्हणाले…

कोरोनामुळे जगभरातील उद्योग बुडाले मात्र ‘या’ तीन उद्योजकांची चांदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या