‘इंग्लिश पलटण’शी कशा लढल्या ‘भारताच्या रणरागिणी’?

‘इंग्लिश पलटण’शी कशा लढल्या ‘भारताच्या रणरागिणी’?

भारतीयांसाठी क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तर ते एक वेड आहे. झपाटलेपण आहे. इतकी वर्ष भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनावर पुरुष संघ अधिराज्य गाजवत आला. मात्र त्यांच्या या प्रेमात आता नवा वाटेकरी निर्माण झालाय. महिला क्रिकेट संघ… यंदाच्या विश्वचषकात पहिल्या सामन्यापासून भारतीय महिलांनी जो खेळ केला. त्याने भारतीय क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडलं. अंतिम सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र हा विजय इंग्लंडसाठी सहजसाध्य नव्हता. भारतीय महिलांनी अक्षरशः त्यांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. त्याच सामन्याची ही थोडी सविस्तर कहाणी- 

Photo- ICC

नाणेफेक इंग्लंडच्या पारड्यात-

कोणत्याही सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा मानला. विश्नचषकाच्या अंतिम सामन्यात हा कौल इंग्लंडच्या पक्षात पडला. संधीचा फायदा घेत इंग्लंडच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Photo- ICC

इंग्लंडची धमाकेदार सुरुवात-

सलामीवीर जोडीची खेळी क्रिकेटमध्ये महत्वाची मानली जाते. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर इंग्लंडला चांगली सुरुवात मिळाली. सलामीवीर लॉरेन विनफिल्ड आणि टॅमी बेमाँटही यांनी सावध सुरुवात करत इंग्लंडला अर्धशतकाच्या जवळ नेलं. भारतीय महिला गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. तब्बल ११ षटकं दोघींनी या माऱ्याचा धैर्यानं सामना केला.

Photo- ICC

भारताला पहिलं यश-

पहिल्या दहा षटकांमध्ये इंग्लंडची धावगती रोखून धरण्यात भारतीय महिलांना चांगलंच यश मिळालं. याचाच फायदा भारताला पहिलं यश मिळण्यात झालं. आत्मविश्वासानं फलंदाजी करणाऱ्या लॉरेन विनफिल्डला राजेश्वरी गायकवाडनं मागे धाडलं. राजेश्वरीनं इंग्लंडची सलामीची जोडी तर फोडलीच शिवाय आपल्या संघाला आत्मवीश्वास दिला. विनफिल्ड ३५ चेंडूत २४ धावा करुन माघारी परतली.

Photo- ICC

इंग्लंडला सलग दोन झटके- 

इंग्लंडची सलामीची जोडी फोडल्याने भारतीय गोलंदाजांचा आत्मविश्वास उंचावला होता. याच आत्मविश्वासानं भारताला दुसरं यश मिळवून दिलं. १४ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पुनम यादवनं टॅमी बेमाँटला माघारी धाडलं. टॅमी ३७ चेंडूत २३ धावा करुन बाद झाली. त्यानंतर सोळाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पुनमनंच इंग्लंडची कर्णधार हेदर नाईटला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अवघ्या एका धावेवर ती माघारी परतली.

Photo- ICC

मधल्या फळीनं इंग्लंडला सावरलं-

कर्णधार पडल्यावर बाकी साथीदारही सैल पडतात. इंग्लंडच्या बाबत मात्र तसं काही झालं नाही. एकामागोमाग तीन धक्के बसल्यानंतर सारा टेलर आणि नतालिया सिवरने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यांनी आपल्या संघाचं शतक धावफलकावर झळकवलं. १६ व्या षटकापासून ३२ व्या षटाकापर्यंत दोघींनी खिंड लढवली. या भागिदारीने इंग्लंडला चांगली धावसंख्या करण्याचा आत्मविश्वास दिला.

Photo- ICC

झुलन नावाचं वादळ-

इंग्लंड मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय, असं वाटत असताना लॉर्ड्सवर झुलन नावाचं वादळ आलं. या वादळानं इंग्लंडच्या एकापाठोपाठ एक अशा दोन विकेट घेतल्या. याचवेळी इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतल्याने इंग्लंडसमोर संकट उभं ठाकलं. अशा परिस्थितीत नतालिया सिवरनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र तिलाही झुलननंच माघारी धाडलं.

Photo- ICC

इंग्लंडची शेवटपर्यंत झुंज-

भारतीय गोलंदाजांचा टिच्चून मारा सुरु असतानाही इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी कमालीची झुंज दिली. ब्रन्ट, गन्न आणि मार्श या इंग्लंडच्या तळाच्या खेळाडूंनी ५० षटके खेळू काढलीच शिवाय भारताला आव्हानात्मक असं २२९ धावांचं लक्ष्य दिलं.

Photo- ICC

स्मृती मंधानानं निराश केलं-

भारतीय महिलांचा विश्वचषकातील खेळ पाहता भारतीय क्रिकेट रसिकांना भारतीय संघ हे आव्हान सहज पेलेल असं वाटत होतं. त्यासाठी भारताला चांगल्या सुरुवातीची गरज होती. मात्र भारताची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मंधाना शून्यावरच बाद झाली. महत्त्वाच्या सामन्यात स्मृती शून्यावर बाद झाल्यानं सगळ्यानाच मोठा धक्का बसला. 

Photo- ICC

मोक्याची क्षणी कर्णधारानं साथ सोडली-

स्मृती बाद झाल्यानंतर भारतीय संघावर मोठा दबाव आला होता. मात्र भारतीय कर्णधार मिताली राजनं सलामीवीर पुनम राऊतच्या साथीनं भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघींची जोडी चांगली जमलीय असं वाटत असतानाच घात झाला. चोरटी धाव घेण्याच्या नादात मिताली आपली विकेट इंग्लडला बहाल करुन बसली. ३१ चेंडूत १७ धावा करुन मिताली बाद झाली. तेव्हा १२ षटकात भारताच्या धावफलकावर ४३ धावा लागल्या होत्या. 

Photo- ICC

पुनमनं डाव हातात घेतला-

कर्णधार मिताली राज बाद झाल्यानंतर मराठमोठ्या पुनम राऊतनं सामन्याची सूत्रं आपल्या हाती घेतली. हरमनप्रीतच्या साथीनं तिनं भारताचा डाव सावरला. दोघींनी अर्धशतकी भागीदारी केली. झुंजार खेळी करत तिनं आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. 

Photo- ICC

विजयाच्या आशा पल्लवीत-

पुनम राऊत आणि हरमनप्रीतची जोडी चांगली जमली होती. मात्र ८० चेंडूत ५१ धावा करुन हरमनप्रीत माघारी परतली. तेव्हा खेळण्यास आलेल्या वेदा कृष्णमूर्तीनं पुनमला हरमनप्रीतची कमी जाणवू दिली नाही. भारताच्या विजयाच्या आशा आता पल्लवित झाल्या होत्या. विजय भारताच्या अवाक्यात वाटत असतानाच मोक्याच्या क्षणी अॅना शर्बसोलने पुनमला बाद केलं. ११५ चेंडूत ८६ धावांची खेळी करुन पुनम माघारी परतली तेव्हा भारताच्या धावफलकावर ४२.५ षटकात १९१ धावा लागल्या होत्या. 

भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला-

पुनम राऊत माघारी परतली तेव्हा भारताच्या हातात ६ विकेट होत्या. वेदा कृष्णमूर्तीसारखी चांगला खेळ करणारी खेळाडू खेळपट्टीवर होती. मात्र तरी धास्ती होती. अखेर ज्याची भिती होती तेच झालं. पुनमच्या विकेटनंतर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. चेंडूला एक धाव आणि इंग्लंडच्या गोलंदाजांचा मारा रोखणं या दोन गोष्टींचं सातत्या राखण्यात भारताच्या तळाच्या खेळाडूंना अपयश आलं. ठराविक अंतराने भारतीय खेळाडू बाद होत गेल्या आणि भारताचा संपूर्ण संघ ४८.२ षटकात माघारी परतला.

Photo- ICC

…पण कोट्यवधी भारतीयांची मनं जिंकली-

खेळाच्या मैदानात जय-पराजय होतच राहतात. मात्र जो धैर्यानं लढतो तो कायमच लक्षात राहतो. भारतात पुरुष क्रिकेटला जे वलय होतं. त्याच्या कणभरही वलय महिला क्रिकेटला नव्हतं. यंदाच्या महिला विश्वचषकात भारताच्या रणरागिणींनी असा काही खेळ केला, की भारतीयांना त्यांच्या खेळाची दखल घेणंच नव्हे तर अक्षरशः तो पाहण्यास भाग पाडलं. पहिल्या सामन्यापासून भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी केली. त्याच कामगिरीच्या जोरावर भारतीयांनी विश्वचषकाचं स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न भलेही पूर्ण झालं नसेल, मात्र कोट्यवधी भारतीयांना अभिमान वाटावी, अशी कामगिरी तरी या मुलींनी नक्कीच केलीय… 

Photo- ICC

थोडक्यात बातम्यांसाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

Google+ Linkedin