बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माजी राज्यमंत्र्यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’; नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

वर्धा | सध्या महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन महत्त्वाच्या पक्षांची युती होऊन महाविकास आघाडी सरकार कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरी चव्हाट्यावर येत असतानाच आता शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचे माजी राज्यमंत्री आणि हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या निष्ठावंत व ज्येष्ठ नेत्याने पक्ष सोडल्याने हा शिवसेनेला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

अशोक शिंदे हे शिवसेना पक्षाच्या तिकिटावर हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले आहेत. अशोक शिंदे आणि वर्धा जिल्ह्यातील शिवसेनेचे संपर्कप्रमुख व माजी खासदार अनंत गुढे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या वादासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली असतानाही त्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्याने शिंदे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

आज दुपारी दोन वाजता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत अशोक शिंदे हे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. पक्ष प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी महाविकासआघाडी समन्वय समिती स्थापनेच्या तयारीत असतानाच शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी शिवसेनेला राम-राम ठोकल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More