बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

व्यंकय्या नायडूंना बळंच उपराष्ट्रपतीपदाच्या घोड्यावर बसवलं?

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आकड्यांचा खेळ पाहता व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती होणार हे निश्चित आहे. मात्र दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा आहे. कुणी सांगतंय, व्यंकय्या नायडूंना आयुष्यात स्थिरता हवी असल्याने त्यांना उपराष्ट्रपती बनण्यात रस होता तर कुणी सांगतं नायडूंना मोदी-शहांनी बळंच उपराष्ट्रपतीपदाच्या घोड्यावर बसवलं. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया…

व्यंकय्या नायडूंची इच्छापूर्ती?-

दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अशी माहिती पसरवली जातेय, की व्यंकय्या नायडूंनाच उपराष्ट्रपती होण्याची इच्छा होती. व्यंकय्या नायडूंच्या पाठीमागे कोणताही निश्चित जनाधार नाही. त्यामुळे वाढत्या वयासोबतच आपल्याला सन्मानाचं पद मिळावं, अशी व्यंकय्या नायडूंची इच्छा होती. त्यांचा पक्षाप्रति प्रामाणिकपणा पाहता भाजपनं त्यांची ही इच्छा पूर्ण केल्याचं बोललं जातंय. मात्र नायडूसारखा राजकीयदृष्ट्या सक्रीय नेता उपराष्ट्रपतीपदासारख्या अराजकीय पदाची अपेक्षा बाळगेल का? उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी भरतानाही व्यंकय्या नायडू आपल्याला अजूनही पक्षसेवा करण्याची इच्छा असल्याचं का म्हणाले असतील? असे प्रश्न मात्र अनुत्तरित राहतात. त्यामुळेच उपस्थित होतो पुढचा प्रश्न…

व्यंकय्यांना बळंच घोड्यावर बसवलं?-

दिल्लीच्याच नव्हे तर भाजपच्या गोटात व्यंकय्या नायडूंना बळंच उपराष्ट्रपतीपदाच्या घोड्यावर बसवल्याची चर्चा आहे. पक्षाध्यक्ष अमित शहांनी जेव्हा पहिल्यांदा उपराष्ट्रपदीपदाचा प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडला, तेव्हा त्यांनी तो स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. आपलं वय अजून ७० वर्षेही नाही, त्यामुळे आपण आणखी ५ व

र्षे सक्रीय राजकारणात राहू इच्छितो, असं नायडूंनी शहांना सांगितल्याचं कळतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निरोप आल्यानंतर मात्र नायडू त्यांना विरोध करु शकले नाहीत. 

कसं ठरलं व्यंकय्यांचं नाव?-

दलित नेता रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपदीपदाचं उमेदवार बनवल्यानंतर उपराष्ट्रपती दक्षिण भारतातील नेता असावा, असं ठरलं होतं. यासोबच तो आरएसएसचा स्वयंसेवक असावा, अशी अट संघानं घातली होती. व्यंकय्या नायडू या दोन्ही अटींमध्ये तंतोतंत बसतात. लहानपणापासून ते संघाच्या कार्यालयात वाढले. त्यामुळे उपराष्ट्रपदीपदासाठी व्यंकय्या नायडूंच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं. 

उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडूच का? याची काही ठोस कारणं देखील सांगितली जातात. पैकी…

राज्यसभेचं कामकाज व्यवस्थित चालावं म्हणून…-

उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा घटनादत्त सभापती असतो. उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकूनही भाजपला राज्यसभेत पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. अशावेळी सरकारला उपराष्ट्रपतीपदी असा माणूस हवा होता, जो राज्यसभेचं कामकाज व्यवस्थित चालवू शकेल. व्यंकय्या नायडूंनी तब्बल २० वर्षे राज्यसभेत खासदार म्हणून काम पाहिलं आहे. तसेच संसदीय कार्यमंत्री राहिलेल्या वंकय्या नायडूंनी ही जबाबदारीही मोठ्या कौशल्याने पार पाडली आहे. राज्यसभेत भाजपला बहुमत नसल्याने सर्वपक्षीयांची चांगले संबंध असलेले नायडू त्यामुळेच भाजपला उपराष्ट्रपतीपदासाठी योग्य वाटले असावेत.

दक्षिणेत भाजपचा विस्तार व्हावा म्हणून…-

सदस्यसंख्येच्या बाबत भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा केला जातो. मात्र दक्षिण भारतात भाजपचा विस्तार नाही, हे भाजपचं सर्वात मोठं अपयश मानलं जातं. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरही त्यादृष्टीने खास असं काही घडलं नाही.

व्यंकय्या नायडूंच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात आंध्र प्रदेशच्या नेल्लूरमधील विद्यार्थी चळवळीतून झाली. विद्यार्थी चळवळीनंतर १९७८ ते १९८५ या काळात ते आंध्र प्रदेश विधानसभेत होते. १९९८ साली ते कर्नाटकातून राज्यसभेवर गेले. नेल्लूर असं ठिकाण आहे की जे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या सीमेवर येतं. त्यामुळे नायडूंच्या निवडीनं या दोन्ही राज्यात पक्षाला फायदा होईल, असा विश्वास भाजपला वाटतो. 

व्यंकय्या नायडूंना राष्ट्रपतीपदाचं आश्वासन?-

दलित नेते रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपद मिळत असताना त्यांच्यापेक्षा वरचढ आणि राजकीयदृष्ट्या वजनदार नेत्याला उपराष्ट्रपतीपद दिलं जात आहे. दलित मतांचा विचार असला तरी कोविंद यांना उपराष्ट्रपती करुन ते भाजपला सहज साध्य करता आलं असतं. मग प्रश्न उभा राहतो व्यंकय्यांना उपराष्ट्रपती बनवण्यामागे भाजपचं प्रयोजन काय? 

सध्याची राज्यसभेची गरज ओळखून भाजपने हा निर्णय घेतल्याचं कळतंय. सोबतच २०१९ साली पुन्हा मोदी सरकार सत्तेत येण्याचा विश्वास भाजपला आहे. तसं झालं तर राष्ट्रपतीपदासाठी पुढची संधी व्यंकय्या नायडूंना दिली जाऊ शकते. मोदी-शहा जोडीकडून तसं आश्वासनही व्यंकय्या नायडूंना मिळाल्याचं कळतंय. 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More