जनता म्हणजेच ईश्वर आणि ईश्वर भिकारी झाला आहे- शिवसेना

मुंबई | नोटाबंदीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे. जनता म्हणजेच ईश्वर आहे. आणि नोटाबंदीमुळे तोच ईश्वर आता भिकारी झाला आहे, असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातू म्हटलंय. 

प्रत्येक चांगल्या गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी भाजप लगेच पुढे येतो. मात्र देशात घडणाऱ्या वाईट घटनांचं मात्र कुणीचं कसं श्रेय घेत नाही, याचं आम्हाला आश्चर्य वाटतं, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.

नेमकं काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात-

-ब्रिटिशांचे राज्य हे ईश्वरी वरदान असल्याची मुक्ताफळे उधळणारे महान लोक त्या काळी होते तसेच सध्याचे मोदी-शहांचे राज्य म्हणजेही ईश्वरी वरदान असल्याचे ठामपणे मांडणारे लोकही उदयास आले आहेत.

-बरा पाऊस झाला तर तो मोदी सरकारमुळेच, पण विदर्भात सध्या अनेक जिल्हय़ांत कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झालाय आणि त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. ते संकटही मोदी-फडणवीस सरकारचेच ईश्वरी वरदान हे मानायला ते तयार नाहीत.

-बुलेट ट्रेन हे मोदी सरकारचे वरदान, पण काल मालाड येथे रेल्वे ट्रकवर खडी टाकण्याचे काम संपवून घरी परतताना एक्प्रेसच्या धडकेत 3 गरीब महिलांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचेही श्रेय घ्यायला मोदी सरकारतर्फे कोणीच पुढे यायला तयार नाही.

-कोंबडा आरवतो सूर्य उगवून प्रकाश पडतो तोदेखील मोदी अथवा फडणवीस सरकारमुळे असेही सांगायला हे लोक कमी करणार नाहीत. मात्र राज्यात शेतकऱ्यांच्या विजेची कनेक्शन कापली जात आहेत, लोडशेडिंगने जो अंधार पसरला आहे त्या अंधाराचीदेखील जबाबदारी सरकार पक्षाने घ्यायला हवी. अर्थात ती कोणी घेताना दिसत नाही.

-विदर्भातील अनेक परंपरागत उद्योग बंद पडत आहेत. चंद्रपूरसारख्या ठिकाणी बल्लारशा पेपर्स मिलच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात रोजगार मिळतो. येथे पेपर उत्पादनासाठी बांबू उत्पादक शेतकरी त्यांचा बांबू पुरवत असतात, पण जंगलमंत्र्यांनी बांबू उत्पादक शेतकऱ्यांनाच पोकळ बांबू घातल्याने हे शेतकरी हवालदिल आहेत आणि या पेपर मिलसाठी आता आसामसारख्या राज्यातून बांबू आणावा लागतोय.

-विदर्भातील बांबू उत्पादक शेतकरी साफ मेला. अशातून बेरोजगार तरुण पुन्हा नक्षलवादाकडे वळला तर मोदी-फडणवीसांचे ईश्वरी वरदानाचे राज्य त्यांची जबाबदारी घेणार काय? पण निसर्ग नियमाने एखादी चांगली घटना घडली की, त्याचे श्रेय फुकटात पदरात पाडून घ्यायचे, पण इतर बाबतीत डोळेझाक करायची.

-आम्हाला आश्चर्य वाटते ते एकाच गोष्टीचे की, तब्बल १७ वर्षांनंतर हिंदुस्थानी सुंदरीने ‘जगत सुंदरी’ म्हणजेच मिस वर्ल्डचा किताब पटकावला. हरयाणवी कन्या मानुषी छिल्लर असे त्या सुंदरीचे नाव. आता या मानुषीने जगत सुंदरीचा किताब पटकावून देशाची मान उंच केली ती मोदी-शहांच्या सरकारमुळे. ईश्वरी वरदानाचे सरकार दिल्लीत अवतरल्यामुळेच मानुषी विश्वसुंदरी झाली बरं का! हे श्रेय अद्यापि कुणीच कसे घेतले नाही याचेच आम्हाला राहून राहून आश्चर्य वाटत आहे.

-मानुषीचे आडनाव ‘छिल्लर’ आहे म्हणून ती विजयी ठरली. हा मोदींच्याच नोटाबंदीचा विजय. कारण हजार-पाचशेच्या नोटा रद्द केल्यानेच ‘चिल्लर’चा बहुमान झाला, असे सांगायला अद्यापि कुणीच कसे पुढे सरसावले नाही? खरे तर मानुषी छिल्लरने स्पर्धेत जी उत्तरे दिली त्यामुळे ‘ज्युरी’ खूश झाले व त्यांनी या हिंदुस्थानी सुंदरीस फक्त मुखडाच नाही तर तरल मेंदूसुद्धा आहे हे मान्य केले.

-‘‘सर्वाधिक पगार कुणाला मिळायला हवा?’’ असा एक प्रश्न तिला विचारण्यात आला. ‘‘आईला सर्वाधिक मान मिळायला हवा. त्यांना कॅशमध्ये पगाराऐवजी खूप सन्मान आणि प्रेम द्यायला हवं’’ या उत्तराने ज्युरींची मने तिने जिंकली, पण मानुषी छिल्लर ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा जिंकली हे तिचे यश नसून नोटाबंदीचे यश आहे.

-नोटाबंदीनंतर देशात निर्माण झालेली स्थिती चिंताजनक आहेच. कॅश संपली व चिल्लरवर गुजराण करावी लागत आहे. ब्रिटिश व्यापारी म्हणून आले व देशात ‘फोडा, झोडा व राज्य करा’ या पद्धतीने दीडशे वर्षे टिकले. व्यापाऱ्यांचे राज्य हे कधीच ईश्वरी वरदान नसते. त्यातून लूटच होत असते. आताची राजवट ज्यांना ईश्वरी वरदान वाटते त्यांनी ईश्वराचे अपमान करण्याचे थांबवावे. जनता म्हणजेच ईश्वर आहे. ईश्वर भिकारी झाला आहे!