Top News

‘देव कुठे असेल तर तुमच्या रुपाने तो सगळ्यांना दिसतोय’, ‘डॉक्टर्स डे’निमित्त राजेश टोपेंचं डॉक्टरांना पत्र

मुंबई | देशभरात आज ‘राष्ट्रीय डाॅक्टर्स दिवस’अत्यंत भावुक वातावरणात साजरा केला जात आहे. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री विधान चंद्र राॅय यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. कोरोनाचं संकट गडद असताना डाॅक्टर जीवाची पर्वा न करता काम करत आहेत.

आरोग्य यंत्रणा, प्रशासन व सरकार यांच्या समन्वयातून कोरोनाची लढा दिला जात आहे. आजच्या दिवसाचं औचित्य साधत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील तमाम डाॅक्टरांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राजेश टोपे यांचं डाॅक्टरांसाठी पत्र…

प्रिय डॉक्टर्स

“आज तुमचा दिवस.. डॉक्टर्स डे.. त्यानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा! तसा तुमचा कुठला असा एक दिवस असू नये. कारण देवाचा कुठला असा एक दिवस असतो का? तो दररोज आपल्यात हवा असतो. कोरोनाच्या संकटाने राज्याला विळखा घातला. त्या विळख्यातून नागरिकांना सोडवण्यासाठी तुम्ही जीवाची बाजी लावत आहात. आज सगळीकडे धार्मिक स्थळं बंद असताना त्यातील देव कुठे असेल तर तुमच्या रुपाने तो सगळ्यांना दिसतोय, अशी सार्वत्रिक भावना आहे. हजारो रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत ते तुमच्या प्रयत्नामुळे. म्हणूनच तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.”

“गेल्या जवळपास साडेतीन महिन्यांपासून तुम्ही-आम्ही सर्वच कोरोनाला हरवण्याच्या ध्येयाने लढतोय. डॉक्टर, तुमच्या साथीला आरोग्य कर्मचारी आहेत, पोलिस आहेत, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही आहेत. आपल्या सर्वांच्या या प्रयत्नामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत आहेत. नागरिक काळजी घेताना दिसताहेत. त्याची तीव्रता वाढत नाहीये.”

“डॉक्टर, आपली जबाबदारी मोठी आहे. कोरोना झाला या कल्पनेने हादरुन गेलेल्या रुग्णांना उपचार देऊन त्यांच्या मनाला उभारी देऊन त्याना पुन्हा एकदा पूर्ववत करण्याचं काम आपण करत आहात. समोरच्याला कोरोना तर झाला नसेल या संशयानेच माणसांमध्ये काहीशी दरी निर्माण होऊ पाहतेय. मात्र डॉक्टर आपण, कोरोना रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांच्या पाठीवर मायेचा हात देऊन त्यांना केवळ उपचारातूनच बरे करत नाही, तर मानसिक पाठबळ देऊन नव्याने उभंही करत आहात, आपल्या हातून घडणाऱ्या या मानवसेवेचं मोल कशातही मोजता येणार नाही.”

“तुम्ही कोविड योद्धे बनून आघाडीवर राहून कोरोनाशी अथकपणे, अविरत दोन हात करताय. आज राज्यात दीड लाख कोरोनाबाधितांपैकी जवळपास 90 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन केलेल्या या अथक परिश्रमाचेच हे फळ आहे. या संकट काळात आपल्या कुटुंबातील सदस्यांना घरी सोडून येताना आपली मानसिक स्थिती काय होत असेल याची कल्पना आहे, तरीही कर्तव्य भावनेपोटी आपण कोरोनाशी लढायला दररोज घराबाहेर पडतात.आम्ही तुम्ही काळजी घेऊ मात्र तुम्ही घरीच सुरक्षित थांबा, असा प्रेमळ दिलासाही सामान्य नागरिकांना आपण देता, डॉक्टर, तुम्हाला आणि तुमच्या कार्याला सलाम.”

-राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या